कोल्हापूरची मिसळ पोहचली लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये

 

कोल्हापूर: कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीत अग्रस्थानावर असलेली मिसळ जगभर लोकप्रिय आहे. विशेषतः खवय्यांच्या दुनियेत मिसळ अढळ स्थानावर आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरच्या दिग्विजय भोसले यांनी कोल्हापुरी मिसळला नवी ओळख देण्यासाठी आज अनोखा उपक्रम राबवला. एकाच वेळी अडीच हजारांहून अधिक व्यक्तींना मिसळ खायला घालून, विक्रम घडवण्याचा त्यांचा मानस होता. त्यानुसार भोसले आणि त्यांची टीम गेले आठ दिवस अहोरात्र झटत होती. आज रंकाळा पदपथ उद्यानात, तब्बल चार हजारापेक्षा अधिक व्यक्तींनी मिसळीचा आस्वाद घेतला आणि हा उपक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला.
कोल्हापूर हे रांगडं शहर. इथल्या लोकांना चटकदार आणि झणझणीत खाण्याची सवय. जिभेचे चोचले पुरवणारे इथले खवय्ये एखाद्या पदार्थाची चव चाखण्यासाठी आतूर असतात. अशा या अनोख्या नगरीच्या रहिवाशांचं मिसळवर मात्र जिवापाड प्रेम आहे. घरोघरी, हॉटेलमध्ये आणि रस्त्यावरील गाडे, स्टॉलवर मिसळचा स्वाद घेणारे कोल्हापूरकर आपल्याला नेहमी दिसतात. साहजिकच अनेक प्रकारच्या मिसळ उपलब्ध असून, त्यापैकी नेमकी कोणती चांगली, यावर नेहमीच चर्चा सुरू असते. अशा चर्चेपासून दूर राहून, कोल्हापुरातील कॉन्टिनेन्टल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या दिग्विजय भोसले यांनी कोल्हापुरी मिसळला आणखी एक मानाचा टप्पा गाठून देण्यास मदत केली. भोसले यांनी एकाचवेळी अडीच हजारांपेक्षा अधिक व्यक्तींना मिसळ खायला घालण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरू होती. शेकडो सहकारी या उपक्रमासाठी राबत होते. आज सकाळी ७ वाजल्यापासून रंकाळा पदपथ उद्यानात करवीरनगरीतील खवय्यांची गर्दी झाली होती. इथल्या मंचावर भलं मोठं पातेलं ठेवलं होतं. त्यात मिसळीची पातळ भाजी उकळत होती. भोसले यांचे सहकारी पातेलं भरभरून इथल्या स्टॉलवर घेऊन जात होते. कुपन घेऊन आलेल्या व्यक्तींना मिसळीची डिश हातात दिली जात होती. अडीच हजार लोकांना मिसळचा आस्वाद देण्याचं उद्दिष्ट होतं. प्रत्यक्षात मात्र ४ हजारांहून अधिक जण मिसळ खाण्यासाठी उपस्थित राहिले होते. जिल्ह्याच्या कानाकोपर्यातूनच नव्हे, तर पुण्यासारख्या शहरातून देखील काही जणांनी हजेरी लावली होती. पदपथ उद्यानावर मिसळीचा घमघमाट सुटला होता. वाफाळलेली रसरशीत मिसळ कधी एकदा चाखतोय, असं चोखंदळ खवय्यांना झालं होतं. सर्वांनी जागा मिळेल तिथं बसून, तर काही जणांनी उभं राहूनच मिसळचा आस्वाद घेतला. या अनोख्या मिसळची चव चाखून, शेफ दिग्विजय भोसले यांच्यावर कौतुकाचा वर्षावदेखील मिसळ प्रेमींनी केला. या उपक्रमासाठी १२५ किलो मटकीची मोडं, १५० किलो फरसाना, प्रचंड मोठी चार पातेली, त्या पातेल्यात रटरटीत पातळ भाजी तयार केली होती. या उपक्रमासाठी अडीच लाख रुपये खर्च आला. तब्बल चार तास कोल्हापूरच्या खवय्यांनी या मिसळीचा मनमुराद आनंद लुटला. दुपारी १२ वाजता या उपक्रमाची सांगता झाली. या ठिकाणी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, महापौर सरिता मोरे, जयेश ओसवाल, रमेश मैंदरकर यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली. गेली १० वर्षं कुकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या शेफ दिग्विजय भोसले यांनी २०१४ पासून हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. आजच्या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये होणार आहे. कोल्हापूरच्या मिसळीचा झणझणीतपणा जगभर पोहचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं शेफ भोसले यांनी सांगितलं.
कोल्हापूरची झणझणीत मिसळ खाण्याचा आनंद काही औरच असतो. ४ हजारपेक्षा अधिक लोकांनी या मिसळीची चव आज चाखली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!