
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे १८ डिसेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर;राम मंदिरासाठी श्री अंबाबाई मंदिर येथे महाआरती
कोल्हापूर : शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, शिवसैनिकांसह युवा सैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. मा.आदित्यजी ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यातून शहरात भगवे वातावरण निर्माण करण्याची जय्यत तयारी शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी केली असून, कोल्हापूर शहरात त्यांचे भव्यदिव्य स्वागत होणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी कोल्हापूर शहरात आगमन होईल. यावेळी युवा सेनेच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता शिवसेना शाखा सेना ग्रुप, साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ या शाखेचे नूतनीकरण करण्यात आले असून, या शाखेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शहरातील पेठेतील खेळाडूंसाठी शाहू विद्यालय, तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ येथे साकारत असलेल्या रु.६३ लाख रक्कमेच्या मल्टीस्पोर्ट्स मैदानाचे उद्घाटन महापौर सौ. सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांनी “हर हिंदू कि यही पुकार… पेहले राम मंदिर फिर सरकार” असा नारा देत अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी पुढाकार घेतला आहे. सायंकाळी ७.३० वाजता श्री अंबाबाई मंदिर येथे महाआरती आयोजित करण्यात आली आहे. अंबाबाईस राम मंदिरे निर्माण लवकरात लवकर व्हावे यासाठी साकडे घालणार आहेत. यावेळी कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि पदादिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा दौरा युवा सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा असून, या दौऱ्याद्वारे शहरातील वातावरण भगवामय करण्यासाठी शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
_____
Leave a Reply