खा.धनंजय महाडिक यांचा तामिळनाडूच्या राज्यपालांच्या हस्ते गौरव

 

सलग तिसर्या वर्षी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना देशपातळीवरील प्रतिष्ठेचा संसदरत्न पुरस्कार प्रदान, तामिळनाडूच्या राज्यपालांच्या हस्ते चेन्नईत झाला गौरव
संसदेच्या दोन्ही सभागृहात देश-समाजहिताचं काम चालावं ही जनतेची अपेक्षा असते. संसद सुरळीतपणे चालली तर लोकहिताचे अनेक महत्वाचे कायदे मंजूर होतात हा अनुभव आहे. त्यामुळंच खासदारांनी संसदेत सक्रिय असणं महत्वाचं आहे. संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणार्या खासदारांना संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित करणं म्हणजे लोकशाहीचा पाया आणखी बळकट करणं असा आहे, असं प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल भंवरलाल पुरोहीत यांनी केलं. चेन्नई इथल्या राजभवनमध्ये संसदरत्न पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. सलग तिसर्या वर्षी संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचं विशेष कौतुक करण्यात आलं. चेन्नईतील राजभवन मध्ये आज तिसर्यांदा संसदरत्न पुरस्कार खासदार धनंजय महाडिक यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आपण कोल्हापूरच्या जनतेला समर्पित करत असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं.
संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांच्या कामगिरीचं मुल्यमापन, पी.आर.एस. इंडिया, प्रोसेंन्स प्राईम पॉईंट फौंडेशन आणि केंद्रीय संसदरत्न समितीच्या वतीनं केलं जातं. संसदेतील मांडणी, प्रश्न विचारणा, सभागृहातील चर्चेमध्ये सहभाग, खाजगी विधयेक सादर करणं यासह विविध निकषांद्वारे संसदरत्न पुरस्कारासाठी नावं निश्चित केली जातात. या पुरस्काराचं यंदाचं दहावं वर्ष आहे. विशेष म्हणजे आपल्या अभ्यासू कामगिरीच्या जोरावर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सलग तिसर्या वर्षी देश पातळीवरील प्रतिष्ठेच्या संसदरत्न पुरस्कारावर मोहर उमटवली. आज चेन्नई इथल्या राज भवनमधील दरबार हॉलमध्ये, तामिळनाडूचे राज्यपाल भंवारीलाल पुरोहीत यांच्या प्रमुख उपस्थितीत संसदरत्न पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. संसदरत्न पुरस्काराचे संस्थापक के.श्रीनिवासन यांनी पुरस्कार सुरु करण्यामागील भूमिका विषद केली. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सकारात्मक कामांबद्दल, त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची, कौतुकाची थाप ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पुरस्कार विजेत्या खासदारांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एस.कृष्णमुर्ती म्हणाले, एकिकडं संसदेचा वेळ विनाकारण वाया जातोय, अशी ओरड असताना पुरस्कार प्राप्त संसदपटूंनी इतर खासदारांसमोर आदर्श घालून दिला आहे. त्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल पुरोहीत यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कारांचं वितरण झालं. सलग तिसर्या वर्षी संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल, उपस्थितांनी टाळयांच्या गजरात खासदार धनंजय महाडिक यांचं विशेष कौतुक केलं. खासदार सुप्रिया सुळे, भ्रातहरी महाताब, अनुराग ठाकूर, श्रीरंग बारणे, विरप्पा मोईली आणि राजीव सातव यांनाही संसदरत्न पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं. खासदार म्हणून निवडून आल्यापासून, विकासात्मक आणि विधायक दृष्टीनं काम केलं. अनेक वर्षे रखडलेेले कोल्हापूर जिल्हयातील प्रकल्प मार्गी लावले. संसदेत प्रश्नांची अभ्यास पुर्ण मांडणी करत प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याची दखल घेत संसदरत्न हा देशपातळीवरील पुरस्कार सलग तिसर्या वर्षी स्विकारताना, मनस्वी समाधान मिळत असल्याची प्रतिक्रीया खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत अत्यंत प्रभावीपणे कामगीरी केली. पहिली टर्म असतानाही खासदार महाडिक यांनी अत्यंत अभ्यासपुर्ण मांडणी करत, सर्व खासदारांमध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल आपल्याला अभिमान असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी नमुद केले. राज्यपाल पुरोहीत म्हणाले, उत्कृष्ठ संसदपटूंच्या गौरवाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. संसदेचं कामकाज देश आणि समाजहितासाठी व्यवस्थित चालावं, अशी अपेक्षा असते. खासदारांनी विधेयक, कायदा आणि तरतुदीवर सांगोपांग चर्चा करणं गरजेचं असल्याचं पुरोहीत यांनी नमुद केलं. उत्कृष्ठ आणि अभ्यासपुर्ण कार्य करणार्या पुरस्कार प्राप्त खासदारांमुळं, संसदीय ढाचा आणि पर्यायानं लोकशाही अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सोहळयाला प्रोसेन्स मासिकाचे संपादक सुशान कोशी, भावनेश देवरा, आयआयटी मद्रासचे सुदर्शन पद्मनाभन, पीआरएसचे एम.आर.माधवन, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळयाचे डी.डी.चेन्नई वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!