
या प्रदर्शनाचे उदघाटन २५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी आम.हसन मुश्रीफ,कणेरी मठाचे स्वामी प.पू.अदृश्य काड सिध्देश्वर स्वामीजी, आम.महादेवराव महाडिक,आम.अमल महाडिक,जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.शोमिका महाडिक व जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये हे प्रदर्शन भरविण्यात येते यावर्षी प्रदर्शनाचे १२ वे वर्ष असून देश-विदेशातील विविध प्रचलित नामांकित कंपन्यांचा समावेश या प्रदर्शनामध्ये आहे शिवाय पशुपक्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन पर तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांची उत्पादने शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे असे हे सर्वात मोठे प्रदर्शन असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
प्रदर्शनामध्ये ५०० पेक्षा जास्त विविध जातींची जनावरे शेतीसाठी उपयुक्त साहित्य व विविध उत्पादने असणारे ६५० स्टॉल आहेत.याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरुंधती महाडीक यांच्या नेतृत्वाखाली २०० महिला बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात येणार आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला याठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे असेही खा.महाडीक यांनी सांगितले.प्रदर्शनाच्या चारही दिवस शेतकऱ्यांना मोफत झुणका भाकरीचे वाटप केले जाणार आहे.याचा लाभ रोज १० हजार शेतकरी घेतात.
देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलिमर्स यांचे या प्रदर्शनास प्रायोजकत्व लाभले आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद, कोल्हापूर नॅशनल कमिटी ऑफ प्लास्टिक अॅपलिकेशन इन हॉर्टीकल्चर (एन.सी.ए.पी.एच)यांचे सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग भीमा उद्योग ग्रुप आणि क्रिएटिव्ह या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील भीमा कृषी व पशु प्रदर्शन हे किसान प्रदर्शना नंतरचे दोन नंबरचे प्रदर्शन आहे.
मागील वर्षी भीमा कृषी प्रदर्शनात नऊ कोटीचा रेडा सर्वांचे आकर्षण ठरला होता. यावर्षी मात्र दोन वेगळी जनावरे आणली जाणार आहेत जी प्रदर्शनाची खास आकर्षण असणार आहेत . मुऱ्हा जातीच्या म्हैशी ,रेडे,शिवाय लाल कंधारी गाय, पंढरपूरी मधील गायी व रेडे,म्हैस, दिवसाला ४० ते ४५ लिटर दूध देणारी जर्सी गाय, संकरित गाई ,म्हैशी विविध तोतापुरी उस्मानाबादी शेळ्या,बोकड,शंभर ते दीडशे किलो वजनाचे बोकड तसेच गिरीराज ब्लॅक अस्ट्रोलॅप, कडकनाथ कोंबड्या,टर्की कोंबड्या,तीस ते पस्तीस किलो वजनाचे बटेर पक्षी,ससे,गिनींपिक उंदीर,गीज,बदके,परदेशी पक्षी,जातिवंत घोडे,वराहपालन, लातूर वरून देवणी गाय व कुंडल गायी,वेगवेगळे पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती या प्रदर्शनामधून पाहावयास मिळणार आहेत . ५०० पेक्षा जास्त जनावरांचा या प्रदर्शनामध्ये समावेश आहे शिवाय पीकस्पर्धा ,पुष्पस्पर्धा, विविध जनावरांच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती गट शेती योजना ,प्रक्रिया उद्योग कसे चालतात या विषयी माहिती व मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. २६ जानेवारी रोजी “कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना व स्वयंचलित सिंचन व्यवस्थापन” या विषयावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकरे आपले विचार मांडणार आहेत . शिवाय “ऊस लागवड काळाची गरज “या विषयावर माजी शास्त्रज्ञ डॉक्टर .जे.पी. पाटील हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर वसंत दादा साखर संस्था पुणे चे माजी संचालक डॉ.डी.जी.हापसे हे ” कमी खर्चातील शाश्वत ऊस लागवड “याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार .
Leave a Reply