
पुणे : भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म पुण्यातील आहे. ज्या वास्तूमध्ये आनंदीबाई यांचा जन्म आणि मृत्यू झाला त्याच वास्तूमध्ये ‘पुणे भारत गायन समाज’ ही पुण्याच्या सांस्कृतिक वैभवातील एक महत्वपूर्ण संस्था कार्यरत आहे. आज शास्त्रीय संगीतासाठी वाहून घेतलेल्या या वास्तूला दिग्गज संगीतकर्मींचा सहवास आणि आनंदीबाईचे वास्तव्य असा दुहेरी ऐतिहासीक वारसा लाभला आहे, आनंदीबाईंच्या जीवनावर आधारित आगामी ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाच्या टीमने या स्थळी भेट देउन आनंदीबाई यांना मानवंदना दिली.
सामाजिक, आर्थिक परिस्थितीशी झगडत गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविले. आनंदीबाईंनी अमेरिकेतून एम.डी. ही वैद्यकीय सेवेतील मोठी पदवी मिळवली. त्यांच्या असामान्य कामगिरीची दखल घेत इंग्लंडची राणी व्हिक्टोरीया हिने आनंदीबाईंचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्या काळात स्त्री शिक्षण हे पाप मानले जायचे,अशा काळात डॉक्टरी पेशासारखे उच्चशिक्षण घेणाऱ्या आनंदीबाईंचा प्रवास आणि गोपाळरावांचा संघर्ष हा आजही सर्वांना प्रेरणादायी ठरणारा आहे. हाच त्यांचा संघर्षमय प्रवास झी स्टुडीओज, फ्रेश लाईम फिल्मस्, नमः पिक्चर्स निर्मित ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.‘आनंदी गोपाळ’ च्या टीमने या वास्तूला भेट दिली,या प्रसंगी ‘पुणे भारत गायन समाज’च्या अध्यक्षा ज्येष्ठ गायिका शैला दातार, चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस, अभिनेता ललित प्रभाकर, अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद, झी स्टुडीओचे बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी उपस्थित होते
Leave a Reply