कोल्हापुरात दिल दोस्ती दुनियादारीचा ‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट’

 

IMG-20151226-WA0000

कोल्हापूर : ‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ असं म्हणत मैत्रीचा नवा फंडा सांगणारी मंडळी म्हणजे झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतील दोस्तांची गॅंग. वेगवेगळ्या कारणाने मुंबई शहरात आलेले आणि इथल्या जगण्याला आपल्या पद्धतीने समजून घेत स्ट्रगलचाही आनंद घेत एकाच फ्लॅट मध्ये राहणा-या सुजय, कैवल्य, आशुतोष,अॅना, मीनल आणि रेश्मा या सहा दोस्तांची कथा सध्या सर्वच स्तरांत तुफान लोकप्रिय झाली आहे. आजच्या पिढीचे प्रश्न, त्यांच्या गरजा, त्यांची मानसिक स्थिती,त्यांची स्पेस, त्यांची आव्हाने हे सगळं या मालिकेतून अतिशय रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात येतं. या वेगळेपणामुळेच अल्पावधीतच ही सारी पात्र केवळ लोकप्रियच झाली नाही तर ती जणू प्रेक्षकांच्या परिवाराचा आणि दोस्तांच्या कट्याचाही भाग बनली आहेत. अशा या धम्माल मित्र मंडळींना भेटण्याची, त्यांना बघण्याची संधी आता कोल्हापूरमधील त्यांच्या फॅन्सना एका धम्माल रॉक कॉन्सर्टच्या माध्यमातून मिळणार आहे. दिल दोस्ती दुनियादारीचा ‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट २०१५’ येत आहे कोल्हापुरकरांच्या भेटीला. येत्या २६ डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील न्यु हायस्कुल मैदान, पेताळ खरी कॉर्नर येथे संध्याकाळी ६ वा. हा खास कॉन्सर्ट रंगणार आहे. यासाठी केवळ महाविद्यालयातील विद्यार्थांना निशुल्क प्रवेश मिळणार असून प्रवेशासाठी कार्यक्रमाची प्रवेशिका आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक असणार आहे. या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत उपलब्ध आहेत. प्रवेशिकेसाठी महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे.

विषयाचं नाविन्य, नव्या दमाचे फ्रेश कलाकार, आजचे प्रश्न आणि आजच्या संदर्भाची गोष्ट यामुळे ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या झी मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. लोकांमध्ये या सर्वच पात्रांबद्दल जिव्हाळ्याची भावनाही निर्माण झाली आहे. यातील प्रत्येक पात्रामध्ये प्रेक्षक स्वतःचा आणि आपल्या मित्रांचा शोध घेत असतात अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही विविध माध्यमांतून मिळतच असतात. प्रेक्षकांच्या मनात या पात्रांविषयी असलेली उत्सुकता त्यांना भेटण्याची असलेली ओढ लक्षात घेऊनच त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी या खास रॉक कॉन्सर्टचं आयोजन झी मराठीच्या वतीने करण्यात आलं. आतापर्यंत सोलापूर, नाशिक, पुणे आणि औरंगाबादमध्ये झालेल्या या रॉक कॉन्सर्टला तरूणाईचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या कलाकारांच्या संगीताच्या तालावर अवघ्या तरूणाईने ठेका धरला. हाच अनुभव आता कोल्हापुरकरांनाही मिळणार आहे. थ्री डी रॉक कॉन्सर्टच्या संगतीने नववर्षाचं धमाकेदार स्वागत कोल्हापुरकरांना करता येणार आहे.

या रॉक कॉन्सर्टमध्ये झी मराठीवरील सारेगमपच्या मागच्या पर्वाची विजेती ठरलेली जुईली जोगळेकर आणि सहका-यांचा ‘अगम्य बॅंड’ आपल्या सुरांच्या आणि वाद्यांच्या तालावर प्रेक्षकांना थिरकायला लावणार आहे. याशिवाय त्यांना साथ मिळणार आहे ते ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मधील सहाही दोस्तांची. सुजय,कैवल्य, आशुतोष, अॅना, मीनल आणि रेश्मा हे सहाही दोस्त या कॉन्सर्टमध्ये सहभागी होणार असून यामध्ये ते काय परफॉर्म करतील हा प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

आजच्या तरूणाईची गोष्ट त्यांच्याच भाषेत मांडणारी ही मालिका युथफुल असली तरी ती सर्व प्रेक्षकांचा विचार करून बनवली आहे त्यामुळे ती सर्वांनाच आवडेल अशी झालीये. नात्यांच्या पलिकडची मैत्रीची ही गोष्ट ‘दिल दोस्ती दुनियादारी’ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त झी मराठीवर प्रसारित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!