
कोल्हापूर- कोल्हापुरातील डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपलं आहे. त्यांना मिळणारा पॉकेटमनी अवांतर बाबीवर खर्च न करता समाजातील गरीब-गरजू व्यक्तींना धान्य, शालेय साहित्य देण्याचा स्तुत्य उपक्रम गेले वर्षभर हे विद्यार्थी राबवत आहेत.
महाविद्यालयीन जीवनामध्ये स्वैर, स्वच्छंदी आणि मर्जीप्रमाणं जीवनाचा आनंद लुटणारे विद्यार्थी आपण पाहतो. पण याला कोल्हापुरातील डी.डी. शिंदे सरकार कॉलेजमधील काही विद्यार्थी अपवाद आहेत. अकरावी कॉमर्समध्ये शिकणारे रोहन कुलकर्णी, सारंग माळी, अरुज गुरव, यश लटके, तनसिम महांबरी, आशुतोष कुलकर्णी, साईदीप माने यांच्यासह ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सोशल हेल्पर्स ग्रुप स्थापन केलाय. हे सर्वजण दरमहाचा आपला पॉकेटमनी वाचवून समाजातील गरीब-गरजू व्यक्तींना धान्य, शालेय साहित्य, कपडे यांचं वितरण गेले वर्षभर करत आहेत. जानेवारी महिन्यात जमा झालेलं हे साहित्य कळंबा, तपोवन परिसरातील गरीब-गरजू व्यक्तींना स्थानिक शिवसेना युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते जिद्द स्पोर्टस्च्या सहकार्यानं देण्यात आलं. महाविद्यालयीन जीवनाच्या सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांनी जपलेल्या या सामाजिक बांधिलकीची क्षीरसागर यांनी प्रशंसा केली.
Chan zali ahe batmi