
रायगड : दुर्ग संस्थांनी वज्रमूठ बांधून गडकोटांच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी अभिमान महाराष्ट्र गड किल्ले संवर्धन मोहिमेची घोषणा करत त्यांचा जीआर यांच्याकडे दिला.तसेच गडकोटांच्या जतन व संवर्धनासाठी फेडरेशन स्थापन करावे, गडकोटांवर प्लास्टिक पिशव्या व बाटल्या यांना बंदीकरिता कायदा व्हावा, किल्ल्यांची सर्व समावेशक माहिती पुस्तिका तयार करावी व दुर्ग संवर्धन संस्थांचा सोशल नेटवर्किंग ग्रुप करण्यात यावा, असे ठराव मंजूर करण्यात आले.
रायगड विकास प्राधिकरणतर्फे दुर्ग परिषद झाली. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून हत्तीखाना परिसरात परिषद झाली.

संभाजीराजे म्हणाले,”गडकोटांच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित केले असून, पाच ते सहा स्टेकहोल्डर एकत्र यायला हवेत, असा विचार करून दुर्ग परिषदेचे आयोजन केले आहे. फेडरेशन स्थापनेतून गडकोटांचा विकास शक्य आहे. स्थानिक रहिवाशांच्या रोजगाराची व्यवस्थेसाठी त्यांना आम्ही निश्चित केलेल्या ठिकाणी गाळे नाममात्र शुल्कात देण्यास प्रयत्नशील आहोत. गडावरील रहिवाशांचे स्थलांतर करायचे असेल तर एकत्र बसून चर्चा केली जाईल.”
पर्यटन मंत्री जयकुमार रावळ म्हणाले, “रोजगार हमी योजनेतून स्थानिक रहिवाशांना रोजगार मिळणार आहे. दुर्ग संस्थांनी सेवक मावळा म्हणून काम करावे. अभिमान महाराष्ट्र गड किल्ले संवर्धन मोहीमेची घोषणा आज झाली आहे. सर्व किल्ल्यांवर एकाच दिवशी ती सुरू केली जाईल. नियोजनपूर्वक काम करत दुर्ग संवर्धनाच्या जन जागृतीचे काम करूया.”
त्यांनी पर्यटन विभागातर्फे गाईड ट्रेनिंग कोर्स सुरू केला जाईल, असे सांगितले.सांस्कृतिक खात्याचे सचिव भूषण गगराणी म्हणाले, “गड राखणं आव्हानात्मक काम असून, महाराष्ट्रातील गडकोटांची तुलना अन्य गडकोटांशी करून चालणार नाही. सर्वजण एकत्र आलो तर गडकोटांचे संवर्धन करता येईल.पुरातत्त्व व वस्तू संग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी वन विभागाला असलेले अधिकारी व निधी याचा विचार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक बिपीनचंद्र नेगी यांनी कायद्याच्या दृष्टीने दुर्मिळ शिल्पे, अवशेष चोरी केली तर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सांगितले.
Leave a Reply