
मुंबई: एकांकिका क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या अस्तित्व पारंगत एकांकिका पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली असून यंदा मुंबई आणि उर्वरित महारष्ट्रातल्या संस्थांच्या एकांकिकांमध्ये पारंगत ठरण्यासाठी मोठी चुरस दिसून येत आहे.यंदाच्या नामांकनांमध्ये सिद्धार्थ-अविरतची ‘देव हरवला’, गंधर्व कलाधाराची ‘रेनबोवाला’, थिएट्रॉन एंटरटेनमेंटची’ J4U म्यूज़िकल’, आमचे आम्ही पुणेची ‘आय ऍग्री’, स्वामी नाटयांगणची ‘बिफोर द लाईन’, एम डी कॉलेजची ‘तुरटी’, पाटकर कॉलेजची ‘पैठणी’, न्यू आर्टस् महाविद्यालय,नगरची ‘लाली’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबादची ‘मादी’ आणि पेमराज सारडा महाविद्यालय,नगरची ‘पी.सी.ओ’ या एकांकिका पारंगत सन्मानाच्या स्पर्धेत आहेत.एकांकिका क्षेत्रातल्या सर्व नव्या दमाच्या रंगकर्मींना स्पर्धेशिवाय एकत्र आणून त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा खेळीमेळीच्या वातावरणात आढावा घ्यावा या हेतूने ‘अस्तित्व’ या मुंबईतल्या प्रयोगशील नाट्यसंस्थेतर्फे दरवर्षी पारंगत सन्मान संध्येचे आयोजन केले जाते. युवा रंगकर्मींचे स्नेहसंमेलन म्हणून लोकप्रिय ठरलेल्या पारंगत सन्मानांचे वैशिष्ट्य म्हणजे या पुरस्कारांवर याआधी नाव कोरणारी सर्वच मंडळी सिनेमा,मालिका,नाट्यक्षेत्रात पारंगत ठरली आहेत.यंदा ही सन्मानसंध्या रविवार २४ फेब्रुवारीला प्रभादेवीच्या पु.ल.देशपांडे कला अकादमीतल्या मिनी थिएटर मध्ये संध्याकाळी आठ वाजल्यापासून रंगणार आहे. अस्तित्व तर्फे हा सोहळा मुंबईतल्या विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी पार पाडतात,नामांकन घोषणा,पुरस्कार वितरणाबरोबरच सादर होणारी प्रहसन हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण असते.यंदाच्या सोहळ्याविषयी अधिक माहिती देताना अस्तित्वचे संचालक रवी मिश्रांनी सांगितले की, यंदा मोरया इव्हेंट्स च्या हास्यविष्कार बरोबर विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी पारितोषिकप्राप्त स्कीटस सादर करणार आहेत.यात हसतखेळत वर्षभराचा आढावा घेतला जाईल. एकांकिका कलाकारांच्या या अनोख्या स्नेह्संमेलनाबद्दल नाट्यक्षेत्रात विशेष उत्सुकता आहे.
Leave a Reply