
कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या श्रमावर देशाचा विकास होत असताना सुद्धा कामगार विरोधी धोरण सध्या सरकार आणत आहे त्या विरोधात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस म्हणजेच इंटक संघटनेच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व केंद्रीय श्रमिक संघटना एकत्रित आल्या आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांमुळे कामगारांचे भवितव्य धोक्यात आले असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराज सभागृह, मार्केट यार्ड येथे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार आहे. सदर अधिवेशनास राज्यभरातून महाराष्ट्र इंटकला संलग्न असलेल्या संघटनांचे पंधराशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. हे अधिवेशन 11 ते 6 या वेळेत होणार असून दुपारी बारा वाजता इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉ. जी संजीवा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सहप्रभारी श्रीमती सोनल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. तसेच या राज्यस्तरीय अधिवेशनात कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश आवाडे , आमदार हसन मुश्रीफ, जयवंतराव आवळे सतेज पाटील ,सचिनभाऊ अहिर, महापौर सरिता मोरे,उपमहापौर भूपाल शेटे, के. पी .पाटील, गुलाबराव घोरपडे, प्रल्हाद चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. केंद्र व राज्य सरकारची धोरणे मालक धार्जिणे झालेली असताना कामगार चळवळी पुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. महाराष्ट्र इंटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनात कामगार एकजुटीसाठी व कामगार विरोधी धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी एल्गार पुकारण्यात येणार असून आगामी काळात कामगार चळवळीचे नेतृत्व अधिक गतिशील करण्यासाठी कार्यक्षम कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यात येणार आहे. वर्षभरात कामगार प्रशिक्षणावर भर देऊन प्रशिक्षित संघटक तयार करण्यात येणार आहेत. देशभरातील विविध असंघटित कामगार संघटनांनाएकाच छताखाली आणून त्याचे नेतृत्व करून संघटनांची शक्ती वाढवली जाणार आहे. सध्या कामगारांना कोणतेही संरक्षण लाभ मिळत नाही. सार्वजनिक, बँका, रेल्वे, विमा, पोस्ट, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक या सर्व ठिकाणी खाजगीकरण व कंत्राटीकरण सुरू आहे. हे जनहितविरोधी व सामाजिक सुरक्षा धोक्यात आणणारे आहे. यामुळे कोट्यावधी कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक सामाजिक शोषण होत आहे. मागील व नऊ वर्षापासून कोणतीही वेतन वाढ झालेली नाही. त्यामुळे कामगारांना संघटित करणे आवश्यक आहे. हाच मूलमंत्र इंटक संघटनेने घेतलेला असून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र इंटकचे सचिव मुकेश तीगोटे, हिंदुराव पाटील, शामराव कुलकर्णी, शिवानंद अहिरवाडे, आप्पासाहेब साळोखे, चंद्रशेखर पुरंदरे, राजू पवार, सुवर्णा जाधव, सारिका शिंदे, नगमा शेख, उदय भंडारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply