
कोल्हापूर : मोठी स्वप्ने पाहा, सृजनशील बना, सातत्याने आत्मपरीक्षण करा व नवता, सर्वौत्कृष्टतेचा ध्यास धरा, नवतंत्रज्ञान आत्मसात करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय मूल्यसंस्कृती प्राणपणाने जोपासा, अशी यशाची पंचसूत्री तिरुचिरापल्ली येथील आय.आय.एम.चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्नातकांना आज येथे दिली.
शिवाजी विद्यापीठाचा ५५वा दीक्षान्त समारंभ विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आज दुपारी झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मेत्री बोलत होते. यावेळी कुलपती चे. विद्यासागर राव यांनी स्नातकांना उपदेश केला. ते म्हणाले, नवस्नातक पदवी, पदविका, प्रमाणपत्रे घेऊन नव्या युगात प्रवेश करीत असताना आपली वाणी आणि कृती या दोहोंच्या संदर्भाने आपण आपली पात्रता सिद्ध करावी. यावेळी उपस्थित स्नातकांबरोबरच अनुपस्थित स्नातकांवरही कुलपती यांनी पदवी प्रदान करून अनुग्रह केला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, उच्चशिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, संशोधनातून उद्योगनिर्मिती, नाविन्यपूर्ण व अभिनव संशोधन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि भविष्यवेधी अभ्यासक्रम या पंचसूत्रीचा आधार घेऊन शिवाजी विद्यापीठाने आपली वाटचाल चालविली आहे.
दीक्षान्त समारंभात सत्यजीत संजय पाटील या विद्यार्थ्यास सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती पदक, तर साक्षी शिवाजी गावडे हिला कला शाखेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्णपदक मिळाले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्यासह शिक्षक, ग्रंथालयातील अधिकारी, प्रशासकीय सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply