
कोल्हापूर : 8 मार्च या महिला दिनानिमित्त स्पीड न्यूज या मोबाईल आणि ऑनलाइन न्यूजपेपर च्या मुख्य प्रतिनिधी शुभांगी तावरे यांचा पत्रकारांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या सुषमा देसाई यांनी
आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत राजकारणापासून ते खासगी कंपन्यांमध्ये महिला सक्रिय आहेत. पण अजूनही महिलांना त्यामानाने स्थान मिळत नाही. पुरुषांच्या बरोबरीने काम करणे, घर- संसार, परंपरा सांभाळत आपले कर्तृत्व सिद्ध करणे हे महिलांसाठी आव्हानच आहे. अशा परिस्थितीत महिला पत्रकारांनी आपल्या लेखणीतून याचे विवेचन करणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने आयोजित पत्रकार महिलांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. कोणताही धर्म किंवा परंपरा सांभाळताना त्याचा पहिला त्रास महिलांनाच होतो यात बदल झाला पाहिजे असेही सुषमा देसाई म्हणाल्या.
उद्योग क्षेत्रात तर फार कमी महिला आहेत. हे उद्योजिका म्हणून काम करताना नेहमीच जाणवते. नेहमी इतरांच्या कार्यक्रमांचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारांचा आज प्रेस क्लबच्या वतीने सत्कार होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे असे गौरवोद्गार उद्योजिका राजसी सप्रे- जाधव यांनी काढले. पुरुषांच्या बरोबरीने पत्रकार क्षेत्रात महिला तेवढ्याच कार्यक्षम पद्धतीने काम करतात. याचा सन्मान व्हावा म्हणून महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सत्कार करत आहे. तसेच प्रेस क्लबच्या आवारात महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र व सुसज्ज महिला पत्रकार कक्षाची उभारणी लवकरच करण्यात येणार असल्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी विविध प्रसार माध्यमातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मोरे यांच्यासह महिला पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त केली. आभार उपाध्यक्ष समीर मुजावर यांनी मांडले. कार्यक्रमास कार्याध्यक्ष सदानंद पाटील, सचिव बाळासाहेब पाटील, खजानीस इकबाल रेठरेकर, प्रसिद्धीप्रमुख अक्षय थोरवत यांच्यासह प्रेस क्लबचे पदाधिकारी संचालक व प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरामन उपस्थित होते.
Leave a Reply