
तीस-तीस वर्षे रखडलेले प्रश्न सोडवले. त्यामुळे कोल्हापूर- कोकण रेल्वेशी जोडले गेले. मराठा आरक्षण, महिलांना रेल्वे मधील सुरक्षा, मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप, शिवाजी पुलाला पर्यायी पुल तयार होण्यासाठी पुरातत्व खात्याच्या कायद्यात बदल, अशी अनेक कामे झाली. तरीही काहीजण कुठली विकासकामं झाली, असा प्रश्न विचारतात, त्यांच्या बुध्दीची किव येते. आंधळ्याचे सोंग घेतलेल्या आणि जनतेच्या प्रश्नांपासून लाखो मैल दुर असलेल्या नॉट रिचेबल उमेदवाराला खासदार महाडिक यांची विकासकामे कशी दिसणार, त्यांनी हिम्मत असेल तर विकासाच्या मुद्यावर बोलावे, असे आव्हान महापालिकेचे विरोधी पक्षनेता विलास वास्कर यांनी दिले. दौलतनगर परिसरातील महिला कार्यकर्त्यांचा मेळावा खरे मंगल कार्यालयात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या खरे मंगल कार्यालयात भागीरथी महिला संस्थेच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक, महापालिकेतील विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेविका रुपाराणी निकम, सुनंदा मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी, गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. संसदेत उत्तम कामगिरी आणि विकासकामांच्या धडाक्यामुळे महिलांसह सर्वसामान्य जनता भक्कमपणे आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत उच्चांकी मतांनी विजयी होण्याची आपल्याला खात्री असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. महापालिकेचे विरोधी पक्षनेता विलास वास्कर यांनी बोलताना, खासदार महाडिक यांनी विमानतळ, पर्यायी शिवाजी पूल, बास्केट ब्रिज, कोकण रेल्वे यासारख्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिली. तीस – तीस वर्षे रखडलेले प्रकल्प पूर्णत्वाला नेले. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी घेतलेले परिश्रम कोल्हापूरची सुज्ञ जनता जाणून आहे. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांना सगळ्याच स्तरातून पाठिंबा मिळतोय. मात्र कायम नॉटरिचेबल असणार्या आणि जनतेच्या सुख-दु:खाशी काहीच देणे-घेणे नसणार्या, मतदार संघाकडे पाच वर्षात एकदाही न फिरकलेल्या, आंधळ्याचे सोंग घेतलेल्या विरोधकांना खासदार महाडिक यांची विकासकामे कशी दिसणार, असा टोलाही विलास वास्कर यांनी लगावला. या मेळाव्याला सौ. अरूंधती महाडिक यांनीही संबोधित केले. महिला सक्षमीकरणाची चळवळ अखंडपणे चालू राहिल आणि त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी महिला वर्गाने रहावे, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी विश्वराज महाडिक, महेश वासुदेव, महेश गायकवाड, संग्राम निकम, पद्मावती पाटील, काका पाटील, शुभांगी पालकर, अलका वाघेला,रेखा आगलावे, सुवर्णा पोवार, उदय शेटके यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Leave a Reply