
कोल्हापूर : आपण दिव्यांगाना मदत करून पुण्य कमावतो आहोत अशा थाटात दिव्यांगाविषयीची वांझ सहानुभूती बाळगणाऱ्यांची वृत्ती क्लेशदायक आहे असे स्पष्ट मत लेखिका सोनाली नवांगुळ यांनी व्यक्त केले. ‘अरूण मंगल ट्रस्ट’ यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या अरविंद देशपांडे पुरस्काराने नवांगुळ यांना रविवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये गौरवण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
येथील ‘अक्षर दालन’आणि ‘निर्धार प्रतिष्ठान’यांच्यावतीने आयोजित अक्षरगप्पांच्या १०२ व्या कार्यक्रमामध्ये अरूण मंगलचे संस्थापक अरविंद पित्रे आणि मंजुश्री पित्रे यांच्या हस्ते नवांगुळ यांना सन्मानचिन्ह आणि १० हजार रूपयांचा धनादेश देउन गौरवण्यात आले.
एकुणच समाजामध्ये घडणाऱ्या प्रसंगांचा दाखला देत यावेळी नवांगुळ यांनी अनेक विसंगती आणि वास्तवावर यावेळी बोट ठेवले. आठ वर्षांपूर्वी याच ‘अक्षरगप्पा’ च्या व्यासपीठावर मी माझ्यातील साचलेलं सगळं बोलून रीती झाले होते. माझ्या स्वतंत्र जीवनाची सुरूवात करताना ते रिकामं होणं मला आवश्यक होतं. तीच मी आता पुन्हा नव्यानं या व्यासपीठावरून सहा पुस्तकांची लेखिका म्हणून बोलत आहे याचा मला आनंद आहे.
आपल्याकडे दिव्यांगाविषयीच्या कायदे अमंलबजावणीमध्ये प्रामाणिक प्रयत्न नसल्याने सेवावृत्तीला बहर येत असल्याच सर्रास चित्र पहावयास मिळते. माध्यमांनीही अशा सेवावृत्तीची भलावण करण्यापेक्षा त्यांच्या मुळ प्रश्नांना हात घालण्याची गरज आहे. त्यामुळे दिव्यांगाचाही माणुस म्हणून प्राधान्याने विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना सहकार्य करणाऱ्यांनाही वेगळ्या कोंदणामध्ये बसवण्याची गरज नाही असे त्या म्हणाल्या.
रविंद्रनाथ जोशी यांनी स्वागत केले. डा. रूपा नागावकर यांनी ट्रस्टच्या परिचय करून दिला. अरविंद पित्रे यांनी प्रास्ताविक केले. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला राम देशपांडे, डा. ज. ल. नागावकर, महेश धर्माधिकारी, पी. डी. देशपांडे, विश्वास सुतार, किशोर देशपांडे, अरविंद राणे, रजनी हिरळीकर, अनंत घोटगाळकर, उदय कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोनाली नवांगुल यांना अरविंद पित्रे आणि मंजुश्री पित्रे यांच्या हस्ते अरविंद देशपांडे पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी समीर देशपांडे आणि रवींद्र जोशी उपस्थित होते.
Leave a Reply