
भुदरगड: तालुक्यातील गारगोटी येथे नुकताच भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्याला गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे, माजी आमदार बजरंग देसाई, गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना धैर्यशील देसाई यांनी, विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या २५ वर्षात झाली नव्हती अशी अनेक कामे खासदार धनंजय महाडिक यांनी करून दाखवली. शेतकर्यांना कर्ज माफी, गायीच्या दुधाला अनुदान, मराठा समाजाला आरक्षण, कोल्हापूरी चप्पलचे पेटंट, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण आणि नुकसान भरपाई, बेकायदेशीर उत्खनन, महिलांची सुरक्षा आणि आरोग्य संवर्धन अशा अनेक मुद्दयांना खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत वाचा फोडली. समाजाच्या प्रत्येक स्तराला न्याय मिळावा, यासाठी तळमळीने काम केले. कोट्यवधींचा निधी आणून, रस्ते, सांस्कृतिक हॉल, शाळांना सहाय्य अशी कामं केली. तरीही निवडणूकीच्या तोंडावर कुणी तरी उठतो आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यावर बिनबुडाची टिका करतो, हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा धैर्यशील देसाई यांनी दिला. गेल्या पाच वर्षात जे उमेदवार एकदाही या परिसरात फिरकलेले नाहीत, ज्यांना लोकांचे प्रश्न, समस्यांचा अभ्यास नाही, जे स्वत: निष्क्रीय आणि नॉट रिचेबल असतात, त्यांना विकासकामे कशी दिसणार आणि मतदार त्यांना कसा थारा देणार, असा टोला देसाई यांनी हाणला. खासदार धनंजय महाडिक यांनी या तालुक्यात केलेल्या कामांचा त्यांनी अभ्यास करावा, म्हणजे नेतृत्व कसे असते हे त्यांना कळेल, असेही देसाई म्हणाले. गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी बोलताना, दुध उत्पादक शेतकर्यांच्या भल्यासाठी खासदार महाडिक खंबीरपणे उभे असतात असं सांगून, बर्याच वर्षानंतर कोल्हापूरला खमके आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व लाभल्याचे सांगितले. धनंजय महाडिक यांनी बोलताना, गेल्या निवडणूकीत राधानगरीतील जनतेने दिलेल्या मताधिक्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. जनतेचा विश्वास सार्थ ठरवून, प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे राधानगरीतील जाणकार जनता आपल्या सोबत राहील, याची खात्री असल्याचे खासदार महाडिक म्हणाले. यावेळी जयराज देसाई, सरपंच संदेश भोपळे, गायत्री भोपळे, प्रकाश कुलकर्णी, शिवाजी मातले, बिजकींग महाडिक, उत्तम पाटील, हिंदुराव देसाई, दिनकरराव भोईटे, टी एस देसाई यांच्यासह पदाधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.
Leave a Reply