
कोल्हापूर:सोशल मीडियामुळे सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा र्हास झाला आहे. यातून मोठ्या प्रमाणात माहिती संघर्ष होत आहे असे म्हणतात पण या निवडणुकीत सर्वच पक्षांनी याचे महत्व जाणले असून प्रिंट मीडिया पेक्षा चौपट वेगाने सोशल मीडिया चा प्रभाव पडतो आहे असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञानाचे अभ्यासक डॉ. राजेंद्र पारिजात यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा पत्रकारिता व जनसंवाद विभाग, कोल्हाूपर प्रेस क्लब आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने आयोजित निवडणुका आणि सोशल मीडिया या एकदिवसीय सेमिनारच्या दुसर्या सत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोलापूरच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर होते.
डॉ. पारिजात म्हणाले, सोशल मीडियावरील माहिती अपुरी, अस्पष्ट आणि गोंधळ उडवून देणारी असते. किंबहुना तुकड्या तुकड्याने ही माहिती येत असल्याने नीट अर्थबोध होत नाही. बरीचशी माहिती भावनाप्रधान असते. त्यामुळे विचारशून्यता वाढते. विवेकाला थारा मिळत नाही. परिणामी सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पण एखादी चांगली गोष्ट वाऱ्यासारखी याद्वारे पसरते.तसेच वाईटही पण निवडणुक आयोगाने आचारसंहिता जारी करुन याअनुषंगाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
विभागीय माहिती संचालक सतीश लळीत यांनी सोशल मीडियाविषयी तपशीलाने माहिती दिली. निवडणुक आयोगाने सोशल मीडियावरील जाहिराती तसेच अन्य प्रचारकी स्वरुपाच्या मजकुरावर नियंत्रण आणले असून, याविषयीची सचित्र माहिती त्यांनी दिली. आयोगाच्या सीव्हीजील या अॅपद्वारे निवडणुकीतील गैरप्रकाराविषयी नागरिक तक्रार करु शकतात. या तक्रारींचा निपटार शंभर मिनिटांच्या आत करण्याची तरतूद आहे, असेही लळीत यांनी नमूद केले.डॉ. चिंचोलकर यांनी तरुण वर्गाने सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्व करावा, असे आवाहन केले. स्वागत विभागप्रमुख डॉ. निशा पवार यांनी केले. आभार विद्यापीठाच्या नेतृत्व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी मानले.
Leave a Reply