
कागल: जनसामान्यांच्या हिताच्या योजना कॉंग्रेस प्रणित युपीए सरकारच्या कालावधीत आखण्यात आल्या. त्या योजनांचे श्रेय मोदी सरकार लाटत आहे. ही हातचलाखी आता सर्वसामान्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणूकीत वेगळे चित्र दिसून येईल. गेल्या निवडणूकीवेळी मोदी लाट असतानाही, राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना आपण सर्वांनी निवडून दिले. खासदार महाडिक यांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीतून आपली निवड सार्थ ठरवली आहे. म्हणूनच या निवडणूकीतही खासदार महाडिक यांच्या पाठीशी राहून, त्यांना पुन्हा विजयी करूया, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी बैठका, मेळावे यांचा धडाका लावला आहे. कागल तालुक्यातील पिंपळगाव येथे आमदार मुश्रीफ यांच्या उपस्थितीत, प्रमुख कार्यकर्त्यांची प्रचार नियोजन बैठक पार पडली. आमदार मुश्रीफ म्हणाले, भाजप सरकार हे फसवे सरकार असून, त्यांनी जी कामे केलेली नाहीत, ती केली असा डांगोरा पिटण्याचे काम सुरू आहे. कॉंग्रेस प्रणित युपीए सरकारच्या कालावधीमध्ये, सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांचे नियोजन आणि आखणी झाली होती. त्यानंतर सत्तेत आलेल्या मोदी सरकारने, याच योजनांची अंमलबजावणी करून स्वत:ची टिमकी वाजवण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी हजारो कोटी रूपयांची जाहिरातबाजी केली आहे. गेल्या निवडणूकीत १५ लाख रूपयांचे आश्वासन देवून, मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली. आता चौकीदार बनून फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रवृत्तीला पराभूत करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे मुश्रीफ यांनी नमुद केले. गेल्या निवडणूकीत मोदी लाट असतानाही, धनंजय महाडिक यांना आपण विजयी केले होते. यंदा त्याची पुनर्रावृत्ती करून, खासदार महाडिक यांना लोकसभेत पुन्हा पाठवूया, असे आवाहन त्यांनी केले. खासदार महाडिक यांनी केलेल्या कामगिरीची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी युवराज पाटील म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्वाची असून खासदार शरद पवार यांच्या आदेशानुसार, धनंजय महाडिक यांना प्रचंड मतांनी विजयी करून, त्यांना लोकसभेत पाठवूया. महाडिक यांच्या विजयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय स्तरावर नाव उंचावेल यात शंका नाही, असेही ते म्हणाले. बैठकीला प्रताप माने, सुधीर वाईगडे, कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश तोडकर,भिवा आकुर्डे, अशोक नवाळे, जे डी कांबळे, महेश चौगले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply