
कोल्हापूर: गोरगरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार युवराज देसाई यांनी निवडणूक लढवण्यासाठी निधी गोळा केला आहे. परंतु हा सर्व निधी निवडणुकीत होणाऱ्या अनावश्यक गोष्टींवर खर्च न करता त्या खर्चांना फाटा देत सर्व रक्कम सैन्यदलात काम करणाऱ्या सैनिकांसाठी सुपुर्त करणार असल्याचे युवराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.येत्या २२ एप्रिल रोजी सैनिक निधी सुपूर्द करण्यात येणार आहे.
निवडणूक लढवावी ही सर्वसामान्य कष्टकरी जनतेची इच्छा होती. मला कोणताही राजकीय वारसा नाही. पाच वर्षात मोदी सरकारने जनतेला फसवले. सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये भाजपसरकार बद्दल मोठा असंतोष आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या नावाखाली भाजपने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. तसेच हजारो कोटींची कर्जे बुडवून मोठमोठे उद्योगपती देश सोडून पळून गेले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. हे सरकार उद्योगपतींचे सरकार आहे. अशी टीकाही त्यांनी यावेळी भाजप सरकारवर केली. तसेच गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धनंजय महाडिक यांनी किती संसदेत आवाज उठवला?ते एकदा जाहीर करावे. संसदरत्न म्हणणाऱ्या खासदारांच्या काळात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात हवी तेवढी विकास कामे झाली नाहीत. तर एकीकडे शिवसेनेचे उमेदवार महायुती म्हणून यांचे कोणतेच काम नाही. केवळ वडिलांचा वारसा चालवायचा म्हणून ते निवडणूक रिंगणात आहेत.
जनतेने जर मला संधी दिली तर शेतीमालाला हमीभाव मिळावा म्हणून मी प्रामुख्याने लढणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, नवनवीन उद्योग आणण्यासाठी ही मी प्रयत्न करणार आहे असे युवराज देसाई यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पृथ्वीराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply