
कोल्हापूर: येथील शुक्रवार पेठेतील शंकराचार्य पीठामध्ये आजपासून आद्य शंकराचार्य यांचा 2527 व्या जयंती उत्सवास मोठ्या उत्साहात आणि भक्तांच्या प्रचंड प्रतिसादात सुरवात झाली.
पाच दिवस चालणाऱ्या जयंती उत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासंबंधी अधिक माहिती देताना कार्यवाह शिवस्वरूप भेंडे यांनी सांगितले की, आज पाळणा आणि पुंडलिकबुवा हळबे यांच्या कीर्तनाने उत्सवाला सुरवात झाली.
यापुढे सकाळ व सायंकाळच्या वेळी मान्यवरांचे कीर्तन आणि प्रवचन होईल. शतचंडी, हवन, पूर्णाहूती, कुंकूमार्चन असे विधीही संपन्न होणार आहेत. शुक्रवारी (ता. 17) पीठाचे वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण सकाळी दहा वाजता पप श्री स्वामीजींच्या हस्ते होईल. यावेळी प्रशिक्षणार्थी अपर पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा उपस्थित राहणार आहेत. यामध्ये वैदिक पुरस्कार देशिक कस्तुरे, सांस्कृतिक पुरस्कार सुब्रह्मण्यम शास्त्री, दत्तभार्गव गुलाब टेंग्से, कीर्तनकार पुरस्कार पुंडलिकबुवा हळबे, स्थानिक वैदिक पुरस्कार बाळू काजरेकर, सामाजिक पुरस्कार भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, महिला कीर्तनकार पुरस्कार सौ. प्राजक्ता प्रदीप वझे व होतकरू विद्यार्थी पुरस्कार चेतन महेश पाटणकर व रितेश जीवनराव कुलकर्णी यांना देण्यात येईल. शाल, श्रीफळ व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याचबरोबर शनिवारी (ता. 18) महाप्रसाद व पालखी प्रदक्षिणा होईल. यावेळी पीठामध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते पालखीचे पूजन होऊन ती मार्गस्थ होईल. शहराच्या प्रमुख मार्गांवरून पालखी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात जाईल व तेथून पीठात परत येईल.
याशिवाय पीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ज्ञान या मासिकासाठी सहकार्य करणारे पंडित वि. गो. देसाई, यज्ञेश्वर शास्त्री जोशी, महेंद्र इनामदार, आनंद नाईक, प्रमोद शास्त्री कुलकर्णी, डॉ. सौ. शुभदा दिवाण व शिलदत्त सुळे यांचाही सत्कार स्वामींच्या हस्ते होईल. सर्व धार्मिक विधी पप श्री स्वामी विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या अधिपत्याखाली होत आहे.
Leave a Reply