
कोल्हापूर: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सहा जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला शनिवारपासून आयोजित केले असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा व ते विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवावेत हाच याचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पाच जून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि सहा जून रोजी दुपारी चार वाजता मंगळवार पेठ येथील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक मिरजकर तिकटी, बिनखांबी, पापाची तिकटी पासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत येऊन मिरवणुकीची सांगता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मिरवणुकीमध्ये जिजाऊ आणि बाल-शिवाजी यांच्या वेशभूषेत महिला व बाल चमू सहभागी होणार आहेत.
व्याख्यानमाले मध्ये एक जून रोजी ‘शून्यातून स्वराज्य व साम्राज्यातून शून्य’ या विषयावर यशवंतराव थोरात, दोन जून रोजी ‘सयाजी महाराजांच्या नजरेतून छत्रपती शिवराय’ या विषयावर बाबा भांड आणि तीन जून रोजी इतिहास संशोधक डॉ. निरज साळुंखे ‘छत्रपती शिवरायांचे साम्राज्य: गुजरात ते श्रीलंका’ या विषयावर शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता मार्गदर्शन करणार आहेत. तरी या सर्व उपक्रमांमध्ये व व्याख्यानमालेस जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस इंद्रजीत सावंत, अजय इंगवले शरद साळुंखे, अवधूत पाटील उपस्थित होते.
Leave a Reply