
कोल्हापूर: नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये मोदींची लाट नसतानाही पुन्हा मोदी यांचे सरकार निवडून आले. महाराष्ट्रातही भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. आणि काँग्रेस नेस्तनाबूत झाले. राष्ट्रवादी ही काही प्रमाणात कमी पडल्याचे प्रकर्षाने जाणवते. लोकांनी भाजपला कौल दिला. भाजप पेक्षाही युवक वर्गाने प्रचंड मताने मोदींना निवडून दिले आहे. मोदींकडे बघून मतदान झाले. या संपूर्ण गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रामध्ये युवकांशी संवाद साधण्यात राष्ट्रवादी कमी पडली आहे. युवकांमध्ये आणि नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. तरी उद्याचा विचार करताना आजचे काम आपण चालू ठेवले पाहिजे या शरद पवार यांच्या विचाराने आम्ही नेहमी काम करत राहू अशी ग्वाही शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रोहित पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी कोल्हापूर प्रेस क्लबला भेट दिली. त्यावेळी वार्तालाप करताना त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. आत्ताचे युवक हे इतरांचे अनुकरण करतात. त्यांना सामाजिक दिशा दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधला तरच युवावर्ग राजकारणात येईल. त्यांना व्यासपीठ निर्माण करून देता येईल. संवाद आणि व्यासपीठ युवकांना दिले पाहिजे असे मतही त्यांनी मांडले. महाराष्ट्रात तसेच देशात काँग्रेस सपशेल पराभव झाला. आंतर्गत वाद मिटवून लोकांमध्ये जास्तीत जास्त जाऊन पुन्हा मुळापासून काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी राजीनामा द्यावा की नको याबाबत विचारले असता कोणतेही पद घेऊन लोकांच्या मध्ये जाता येत नाही. मी त्या जागी असतो तर राजीनामा दिला असता असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply