रायगडावर शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा; पाच देशांचे राजदूत उपस्थित राहणार

 

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर पाच आणि सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यंदा ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा व सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे महोत्सवाचे आकर्षण बिंदू असणार आहे.
देशभरातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. रायगडावर शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली असून देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहास प्रेमी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. तसेच पोलंड, चीन, बल्गेरिया, फिनिशिया या देशांचे राजदूत देखील हा ऐतिहासिक सोहळा बघण्यासाठी उपस्थित राहणार आहे. अशी माहिती अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाराष्ट्रातील युद्धकला, आखाडा यांचा यात सहभाग असणार आहे. महाराष्ट्राची पारंपरिक युद्धकला कशी असते याचे दर्शन दांडपट्टा, तलवार, भाला, जंबिया, कट्यार, माडु, फरी, गलका, लाठीकाठी या प्रकारांच्या सादरीकरणातून होणार आहे. सहा जून रोजी मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील बाला बाराबलुतेदार, अठरा अलुतेदार यांसह सर्व धर्मातील लोक ऐक्याच्या पालखी मिरवणुकीत सहभागी होणार आहेत आणि पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. गडावर येणाऱ्या सर्व शिवभक्तांची जेवणाची चहापानाची सोय, आरोग्यसेवा मिनरल वॉटरचे युनिट तसेच शेकडो स्वयंसेवक अशा सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. असे समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. तरी रायगड संवर्धन व ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला अमर पाटील, संजय पवार, हेमंत साळोखे, उदय घोरपडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!