
कोल्हापूर : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विविध पदविका अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शैक्षणिक सुविधांबरोबरच शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपले भवितव्य उज्ज्वल करावे,तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थी १८ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतात असे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विद्यानगर परिसरात असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विविध पदविका अभ्यासक्रम आणि त्यासाठी असणारी शिष्यवृत्ती यासंबंधी अधिक माहिती देताना ते बोलत होते. शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर ही महाराष्ट्रातील पहिली स्वायत्त संस्था असून कोल्हापूर जिल्ह्रातील तांत्रिक शिक्षण देणारी सर्वात मोठी शासकीय पदविका संस्था आहे. संस्थेमध्ये प्रशस्त क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय, कर्मशाळा, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह इत्यादी सोयी आहेत. तसेच संस्थेमार्फत डॉ. पंजाबराव देखमुख वसतिगृह योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविणेत येते, तर दोन सत्रामध्ये तीन वर्षांचे पूर्णकालीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येतात.
सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग, मेटॅलर्जी इंजिनिअरिंग, शुगर टेक्नॉलॉजी अश्या एकूण 520 प्रवेशक्षमता येथे उपलब्ध आहेत.
तसेच 25 जागा अपंगांकरिता राखीव असून त्याकरिता महाराष्ट्रातील कोणीही अपंग अर्ज करू शकतो. त्याचबरोबर संस्थेमध्ये शुगर टेक्नॉलॉजी हा महाराष्ट्रामध्ये एकमेव अभ्यासक्रम राबविणेत येतो. त्याचप्रमाणे शासकीय नियमानुसार संस्थेमध्ये विविध शिष्यवृत्ती राबविण्यात येतात व त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. संस्थेतील संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने गुणवत्तेनुसार करणेत येते.
अनेक नामांकित कंपनीमध्ये संस्थेतील 126 विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झालेले आहे.तरी शासकीय महाविद्यालयात विद्यार्थांनी प्रवेश घ्यावा असेही ते म्हणाले.
यावेळी विभागप्रमुख दिलीप लामतुरे, राजय बलवान, प्राध्यापक अशोक देवडे, महादेव कागवाडे व शशांक मांडरे आदी उपस्थित होते.
Leave a Reply