
कोल्हापूर : राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज, प्रतिज्ञा आणि राजमुद्रा या भारतीय राष्ट्रप्रतिकांचा इतिहास रविवारी संध्याकाळी उलगडण्यात आला. ‘अक्षरगप्पां’च्या १०३ व्या भागामध्ये पुणे येथील मिलींद सबनीस यांनी अतिशय विस्ताराने या प्रतिकांच्या निर्मीतीमागील अनेक कहाण्या यावेळी विशद केल्या.
‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये सबनीस म्हणाले, ‘जन गण मन’ हे गीत पंचम जार्जच्या स्तुतीपर लिहल्याचा आक्षेप घेतला जातो. परंतू अशा प्रकारचे स्तुतीपर गीत लिहण्यासाठी टागोर यांनी नकार दिला होता. मात्र यानिमित्ताने जी परिषद झाली त्यासाठी त्यांनी हे गीत लिहले होते. जार्ज याच्या स्वागतासाठीचे गीत अन्य कवीकडून लिहून घेण्यात आले होते. याबाबत टागोर यांनीच खुलासा केला होता. याच अधिवेशनामध्ये टागोर यांनी सहकाऱ्यांसमवेत जनगणमनचे पहिले जाहीर गायन केले होते.
सारनाथच्या गांधारशैलीतील शिल्पास्तंभावरून तीन मुद्रेचा सिंह ही आपली राजमुद्रा तयार करण्यात आली. या मुद्रेवर ‘सत्यमेव जयते’हे शब्द असावेत यासाठी आंध्रप्रदेशातील सी. व्ही. वारद यांनी भारत सरकारशी ३० वर्षे लढा दिला. यानंतर हे शब्द वापरण्याचे मान्य करण्यात आले. आंध्रप्रदेशातीलच निसर्गोपचार तज्ज्ञ, लेखक पॅडेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये आपल्या शाळेतील मुलांसाठी तेलगू भाषेत पहिल्यांदा प्रतिज्ञा लिहली. नंतर ती सर्व देशभर मान्यता पावली.
भारतीय संस्कृतीमध्ये ध्वजाला अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगून सबनीस म्हणाले, १८५७ सालच्या बंडावेळी जो ध्वज तयार करण्यात आला होता त्यामध्ये भाकरी आणि कमळ या चिन्हांचा वापर करण्यात आला होता. देशासाठी पहिला ध्वज तयार करण्याची कामगिरी मुळच्या विदेशातील असलेल्या भगिनी निवेदिता यांनी करून दाखवली. सभोवती असलेल्या १०८ ज्योती आणि त्यामध्ये इंद्राचे अस्त्र दाखवून त्यावर वंदे मातरम लिहण्यात आले होते.
ऋषि बंकिमचंद्र चटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी लिहलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपले राष्ट्रगीत ठरले नव्हते. त्यामुळे १४ आगस्टच्या मध्यरात्री ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम’ ही दोन्ही गीते गायिली गेली. रविंद्रनाथ टागोर यांच्यापासून ए. आर.रहमान, अजय अतुल यांच्यापर्यंत अनेकांनी ‘वंदे मातरम’ला नवनवीन चाली लावत त्याचे सादरीकरण केले आहे. असे भाग्य केवळ ‘वंदे मातरम’ या गीताला मिळाले. या गीतासाठी बंगालमधील मान्यवरांनी जितके योगदान दिले त्यापेक्षा अधिक योगदान मराठी माणसांनी दिले आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे मार्च सांग म्हणून हे गीत म्हटले जाई अशी माहिती सबनीस यांनी दिली. यावेळी सुभाषचंद्र बोस यांची चित्रफित आणि टागोर यांनी गायिलेले वंदे मातरम ऐकायला मिळाल्याने श्रोते भारावून गेले. रविंद्र जोशी यांनी स्वागत केले तर समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Leave a Reply