
कोल्हापूर: दहा जून रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक जाणिवेतून लोकसहभागातून व समाजातील आवश्यक घटकांना मदत करून साजरा करण्यात येणार आहे. गेली सहा वर्षे समाजातील विविध घटकांना नाविन्यपूर्ण उपक्रमांनी वाढदिवसानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा रद्दीच्या स्वरूपात विक्री करून स्वयंसिद्धा संस्थेस प्रोजेक्टर प्रदान करण्यात आला. तसेच जीवरक्षक दिनकर कांबळे यांची एलआयसी पॉलिसी उतरवण्यात आली. रोपांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारून शहर सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून शहर सुशोभीकरण करण्यात आले. जिल्ह्यात खतांची आवश्यकता लक्षात घेऊन खतांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारून कित्येक टन खत शेतकऱ्यांना देण्यात आले. तसेच शहरी व ग्रामीण भागात महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात आली. यंदाचा वाढदिवस हा दुष्काळग्रस्तांना मदत करून साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. यासाठीच दुष्काळी तालुक्यातील मुलींना शिक्षणासाठी वाढदिवसानिमित्त मदत करण्यात येणार आहे असे राहुल चिकोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तरी शुभेच्छा म्हणून हार, पुष्पगुच्छ, मिठाई न देता दुष्काळी तालुक्यातील मुलींच्या शिक्षणासाठी मदत म्हणून ‘संवेदना सोशल फाउंडेशन’ या नावे चेक अथवा रोख स्वरूपात मदत करावी असे आवाहन संवेदना फाउंडेशनचे राहुल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत केले. त्याच दिवशी दहा जून रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस ग्राउंड येथे ‘ट्रॅफिक पोलीस ग्राउंड’चे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे केसबीपी चे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी सांगितले.
Leave a Reply