
कोल्हापूर : अवकाश तंज्ञत्रान ही देशाची वाढती गरज असून यासाठी विद्यार्थी दशेपासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागलीच पाहिजे, असे सांगून कोल्हापूरात लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लॉंचिंग सेंटर उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
अवकाश संशोधन,रॉकेट्स, सॅटेलाईट, ड्रोन या क्षेत्राबद्दल आवड असणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थीनींसाठी एसडीएनएक्स ही संस्था काम करते. या संस्थेने महाराष्ट्रातील वाटचालीसाठी भालचंद्र चिकोडे ग्रंथालय,जरग नगर,कोल्हापूर यांच्यासोबत सहकार्य करार केला असून, एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅब हे महाराष्ट्रातील पहिले अवकाश विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते निर्माण चौक येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ताशी 1800 किमी वेग असणारे रॉकेट,ड्रोन व विमान यांचेही प्रक्षेपण करण्यात आले.
यावेळी इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्राचे माजी संचालक पद्मश्री शिवराम धोजे, अंजली चंद्रकांत पाटील, कोल्हापूर पेालीस क्षेत्राचे महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे, इस्त्रोचे माजी प्रकल्प संचालक टी.के.सुंदरमुर्ती, एसडीएनएक्सचे संस्थापक संजय राठी, डीआरडीओचे माजी संशोधक वराप्रसाद मुरली, नासा हनीवेल्सचे स्पेस एज्युकेटर अपुर्वा जाखडी, या क्षेत्रातील संशोधक लूक नाथान हायस, गोविंद यादव, मिलाप मुखर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय स्टुडंट रॉकेट लाँचिंगची उभारणी लवकरच करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल. ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष रॉकेट लाँच होईल यादृष्टीने आवश्यक ती सर्व मदत, सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विज्ञान तंज्ञत्रान क्षेत्रात देशाची झपाट्याने प्रगती होत असून यामध्ये अनेक तरूण चमकत आहेत. भारत हा केवळ विविध वस्तुंचे उत्पादन करणारा देश न राहता तो संशोधन करणारा देशही बनला पाहिजे यासाठी लहानपणापासूनच संशोधक व चिकित्सक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. यादृष्टीने एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅब अत्यंत महत्वाची ठरेल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना 36 तासांचा अभ्यासक्रम असून रोबोटिक आर, सॅटेलाईट, रॉकेट आदि विविध अवकाशीय उपकरणे घडामोडींबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात येईल, प्रात्यक्षिके दाखविली जातील. याचा कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी विद्यालयीन प्रयोगशाळांमध्ये आवश्यक साहित्य व सुविधा देण्यात येतील. तसेच फिरत्या प्रयोगशाळांसारखे उपक्रमही राबविण्यात येतील असे सांगितले.
Leave a Reply