
कोल्हापूर: महाराष्ट्रातील विविध देवस्थानांची दैनंदिन पूजाअर्चा करण्यासाठी देवस्थान इनाम वर्ग 3 नुसार पिढ्यान पिढ्या शेतकरी जमिनी कसत आहेत. यापूर्वी पाटील-कुलकर्णी आदी वतने खालसा करून त्या जमिनींची मालकी त्या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यात आली आहेत. परंतु देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना मात्र या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी गेली अनेक वर्ष या जमिनीच्या मालकी हक्कात आपले नाव लागावे म्हणून मागणी करत आहे. त्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सनदशीर मालक मार्गाने आंदोलन केले. आंदोलन आता यशस्वी टप्प्यावर आले आहे. या आंदोलनात देवस्थान जमिती जमिनी कसणार्या शेतकऱ्यांच्या नावे झाल्या पाहिजेत, ही प्रमुख मागणी होती. बारा मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने याबाबत कायदा करण्याची सकारात्मक भूमिका घेतली. विधानसभेत हे विधेयक मांडू असे आश्वासनही देण्यात आले. पण ते पाळले न गेल्याने किसान सभेच्या वतीने पुन्हा नाशिक ते मुंबई असा दुसरा ऐतिहासिक लॉंग मार्च काढण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांना त्या जमिनी मालकी हक्काने देण्याविषयीचे विधेयक जवळजवळ पूर्ण होत असल्याची माहिती देण्यात आली. आणि वीस फेब्रुवारी रोजी हजारो शेतकऱ्यांचा लॉंग मार्च सुरू झाल्यावर महाराष्ट्र शासनाने किसान सभेच्या नेतृत्वाबरोबर पुन्हा चर्चा करून देवस्थान जमीन इनाम वर्ग 3 वतने खालसा करण्याविषयी लेखी आश्वासन दिले. आणि त्यानुसार पावसाळी अधिवेशनात हा कायदा करू असे स्पष्ट लेखी स्वरूपात सांगितले. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सतरा जून रोजी सुरू होत आहे. सरकारला पुन्हा लेखी आश्वासन कृतीत उतरावे याची जाणीव करून देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रविवारी सोळा जून रोजी शाहू स्मारक भवन येथे ‘देवस्थान शेतकरी परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सभेचे अध्यक्ष प्रा.डॉ. उदय नारकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी राज्य किसान सभेचे सचिव डॉ. अजित नवले, देवस्थान शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड उमेश देशमुख, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पत्रकार परिषदेला खजिनदार आप्पा परीट, सुभाष निकम आदी उपस्थित होते.
Leave a Reply