
कोल्हापूर: गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आरक्षण दिल्याने सुटला आहे. हजारो-लाखो लोक सतत रस्त्यावर उतरून मूक मोर्चा, ठोक मोर्चा, रास्ता रोको अशी आंदोलने करत 42 हुतात्म्यांची आहुती दिल्या नंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. या आरक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावला आहे. यामध्ये व्यक्ती, संस्था, संघटना यांचा समावेश आहे. या प्रत्येकाचे कृतज्ञता म्हणून रविवारी सात जुलै रोजी दुपारी बारा वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे कृतज्ञता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने दिलीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जनआंदोलनाचा रेटा वाढवला, त्यात लोकप्रतिनिधींचे साथ तसेच प्रसार माध्यमांची महत्त्वाची भूमिका यामुळेच हे आरक्षण मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. या कृतज्ञता सत्कार सोहळ्यामध्ये जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राजर्षी शाहू महाराजांचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांच्यासह सर्व आजी माजी आमदार खासदार, सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यामध्ये प्रिंट,इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. तरी करवीर नगरीतील सर्व जाती धर्मातील सर्व बंधू भगिनींनी या कृतज्ञता सोहळ्यात बहुसंख्येने सहभाग घेऊन हजर रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, रुपेश पाटील, जयेश कदम,गणीभाई आजरेकर, उत्तम कोराणे, अमर समर्थ, ऍडव्होकेट महादेवराव अडगुळे, बाजीराव चव्हाण, सचिन तोडकर, दिलीप देसाई,शाहीर दिलीप सावंत आदी उपस्थित होते.
Leave a Reply