
कोल्हापूर: १२० वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले होते. ज्या उंचीला शाहू महाराजांनी कोल्हापूरला नेऊन ठेवले ती उंची आपण टिकवू शकलो नाही. ही खंत आहे, परंतु एकत्रित चळवळ व सर्वंकष प्रयत्न यामुळे कोल्हापूरचा विकास नक्की होईल. प्रत्येकातील सकारात्मक भावना एकत्रित केली तर हे सहज शक्य आहे. आपण बदल केला तर नक्की बदलेल. आणि यासाठीच कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदी ज्ञानेश्वर मुळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यासाठी भारतीय जन संविधान मंच आणि कोल्हापूर कॉलिंग च्यावतीने आज त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर मुळे म्हणाले,’ मी कार्यकर्ताच आहे. आणि ही कोल्हापूरची पुण्याई आहे. कोल्हापूरकडे सगळे गुण आहेत. भारतात हा आदर्श जिल्हा बनू शकतो. फक्त एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमास छत्रपती संभाजीराजे आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्ञानेश्वर मुळे यांचा आदर्श आम्ही घेत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे जनआंदोलन उभे राहिले तरच एखाद्या गोष्टीची पूर्तता करता येते. यासाठी जयंती नाल्यावर वृक्षलागवड व स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. उद्या याचा अकरावा रविवार असून संपूर्ण कोल्हापूरकरांची याला साथ मिळत आहे. ज्ञानेश्वर मुळे उपस्थितीत आज वृक्ष लागवड करण्यात आली.सामूहिक प्रयत्नातून कोल्हापूरला पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करू असे आयुक्त यांनी सांगितले. कोल्हापूर कॉलिंगचा हेतूच जगाच्या नकाशावर कोल्हापूरला नेणे हा आहे. कोल्हापूर कडे ऐतिहासिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक वारसा आहे. परंतु आपण कशात पण कमी पडत आहोत याचा शोध घेतला पाहिजे. एकत्रित आल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कोल्हापूरला जाज्वल्य इतिहास आहे. पर्यटनवाढीसाठी वाव आहे. परंतु याची मार्केटिंग होण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर मुळे यांच्या माध्यमातून कोल्हापूरची इमेज व कोल्हापूरच्या विकासासाठी लागणाऱ्या प्रकल्पांची मांडणी दिल्लीमध्ये करता येईल. जिथे पिकते तिथे विकत नाही तसं कोल्हापूरचा झाले आहे असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. कोल्हापूर कॉलिंग हे सामान्य व संविधानिक नागरिकांचे व्यासपीठ म्हणून काम करत आहे. शाहू महाराजांचा विचार मनात रुजवून आचरणात आणला पाहिजे आणि सत्यात उतरवला पाहिजे. कोल्हापूर कॉलिंग च्या माध्यमातून चळवळ उभा करून कोल्हापूरच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे भारतीय जन संविधान मंचचे राष्ट्रीय संयोजक पारस ओसवाल यांनी प्रास्ताविकात नमूद केले. ज्ञानेश्वर मुळे आणि मल्लनाथ कालशेट्टी यांचा सत्कार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. शीतल पाटील, सीमा पाटील, अमर गांधी, मोहन वायचळ, सुनील वासवानी, राजू परुळेकर, सुभाष नियोगी, किशोर देशपांडे, अनुराधा भोसले, प्राध्यापक बी.जी मांगले, सुनिता पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश आरेकर, डॉ. रणजित चिकोडे, डॉ. प्रमिला जरग आदी उपस्थित होते.
Leave a Reply