वाचनकट्टातर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन
कोल्हापूर:हल्लीच्या धावपळीच्या युगात वाचकांची संख्या वाढत असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. या दृष्टीनेच लेखकांनी वाचकांच्या बदलत्या आवडीनुरूप लेखन करावे जेणेकरून चांगल्या प्रकारचे लिखाण वाचकांसाठी उपलब्ध होईल,” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. वाचनकट्टा प्रकाशनतर्फे आयोजित सिराज करीम शिकलगार लिखित ‘आई, ती आणि एकत्र कुटुंबपद्धती’, प्रा. रेखा निर्मळे,चौगुले व प्रा. निगार मुजावर लिखित रिसर्च मेथडॉलॉजी आणि संजय दे. पाटील व युवराज स. कदम संपादित निबंध या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू दालनात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.वाचनकट्टा प्रकाशन तर्फे आज देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिनानिमित्त या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाचनकट्टा संस्थापक युवराज कदम यांनी उपस्थितींना या सोहळ्याची व पुस्तकांची ओळख करून दिली.आई, ती आणि एकत्र कुटुंबपद्धती या पुस्तकात श्री. शिकलगार यांनी सामाजिक जडणघडणीचा आणि एकूणच बदलत्या कुंटुंबपध्दती तसेच संस्कृतीचा आढावा घेतला आहे. निबंध या पुस्तकात कोरोना कालखंडात वाचनकट्टा तर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी निबंधांचे संपादन करण्यात आले आहे. तर रिसर्च मेथडॉलॉजी या पुस्तकात सेट व नेट परिक्षांबद्दलचे अद्यवत ज्ञान व प्रश्न यांचा समावेश आहे. यावेळी युवराज स. कदम, उपप्राचार्य प्रा. टी. के. सरगर, एस. डी. पाटील, डॉ. सचिन चौगुले, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, रियाज मुजावर, वसंत चौगुले, ऋतिक पाटील, सचिन लोंढे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.