
कोल्हापूर: कोल्हापूर शहरामध्ये पूरस्थिती गंभीर बनली असून व्हीनस कॉर्नर शाहूपुरी, कुंभार गल्ली, सिद्धार्थनगर, गंगावेश, शुक्रवार पेठ, न्यू पॅलेस परिसरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो कुटुंबांचे प्रशासनाने स्थलांतर केले आहे. नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून त्या कुटुंबांची व्यवस्था करण्यात आली आहे 2005 सालानंतर यावर्षी अशी परिस्थिती गंभीर बनली आहे. गेले आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे शिवाजी पूल कडून पन्हाळा रत्नागिरी मार्गावर जाणारी संपूर्ण वाहतूक रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद करण्यात आली आहे. या पूरस्थितीमुळे नागरिकांचे दुकानांचे नुकसान होत आहे. आतापर्यंत प्रशासनाच्या माहितीवरून शहरातील दोन कोटी रुपयांचे साहित्याचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. अजूनही शहरांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला नाही तरी पुराच्या पाण्यात हुल्लडबाजी करण्याची तरुणांची प्रवृत्ती वाढत आहे. पोलिसांनी याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आज रोजी संपूर्ण शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. यामुळे पूर पाहण्यासाठी नागरिकांनी शिवाजी पूल परिसरात प्रचंड गर्दी केली होती.
Leave a Reply