
कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज सकाळी नौसेनेच्या दोन विमानातून एका बोटीसह 22 जणांचे पथक तसेच गोवा कोस्टगार्डच्या एक हेलीकॉप्टर बोटीसह दाखल झाले आहे. आज सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्करांनी बोटीद्वारे पूर ग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. काल अखेर जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
काल रात्री लष्कराचे एक पथक दोन बोटीसह तसेच एनडीआरएफचे आणखी एक पथक चार बोटींसह शहरात दाखल झाले. परंतु महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे अडचण निर्माण झाली. आज पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह पथक रवाना झाले तर शहरासाठी दोन बोटींसह मदत देण्यास सुरुवात झाली. आज सकाळी नौसेनेच्या दोन विमानांमधून एका बोटीसह 22 जणांचे पथक शहरात दाखल झाले. त्याचबरोबर गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर एका बोटीसह दाखल झाले आहे. नौसेनेने आज पुन्हा 14 बोटी देण्याचे मान्य केले आहे. प्राधान्याने प्रयाग-चिखलीकडे मदत पाठविली असून आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरु करण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये पूर्णत:, अंशत: पूरबाधीत अशा 204 गावांचा समावेश आहे. काल अखेर या गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांमधील 51 हजार 785 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकीटे देण्यात येणार आहेत. प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि सज्ज आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
Leave a Reply