
कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांच्याशी संपर्क साधून पूरग्रस्तांच्या प्राथमिक सहाय्यतेसाठी राष्ट्रीय आपदा केंद्रातून तातडीने 500 कोटी रुपये अंतरीम मदत म्हणून राज्य शासनाकडे वर्ग करण्याची विनंती केली आहे. कोल्हापूर, सांगली परिसरात थैमान घातलेल्या महापुरात किमान पंधराशे ते दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली असून महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली रोख रकमेची प्राथमिक मदत अपुरी पडण्याची शंका व्यक्त केली आहे. राज्यशासन शक्य ते सर्व काही पण करत असून एकूणच पुराचा व नुकसानीचा आवाका लक्षात घेता सर्व संबंधितांनी परिस्थिती संयमाने हाताळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
हजारो लोकांची घरे, गुरे, पिके, शेती अवजारे वाहून गेले आहेत. लहान व्यावसायिक, दुकानदार, धंदेवाईक, रस्त्यावर आले आहेत. या सर्वांना पुनर्स्थापीत करणेसाठी प्रचंड नियोजन, प्रयत्न व कालावधी लागणार असला तरी त्याची सुरुवात तातडीने होणे आवश्यक आहे. राज्यशासनाने आपले प्रयत्न सुरू केले असले तरी ही राष्ट्रीय आपत्ती आहे हे ध्यानी घेऊन अर्थमंत्र्यांनी सदर कोषातून तातडीने 500 कोटी रुपये द्यावेत अशी विनंती आपण केल्याचे त्यांनी पुढे सांगितले. अर्थमंत्री या राष्ट्रीय आपदा मदत कोषासंबंधी उच्चस्तरीय समितीच्या प्रमुख असून समितीत गृहमंत्री अमित शहा कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर व निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार यांचाही समावेश आहे.
Leave a Reply