
कोल्हापूर :कोल्हापुरात आलेल्या महापुरानंतर शहरात निर्माण झालेले गाळाचे साम्राज्य, पसरलेली दुर्गंधी, महापुराबरोबर वाहून आलेला कचरा यामुळे संपूर्ण शहरच विद्रूप बनले. कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आज हजारो हात झटत आहेत, यामध्ये डीएम ग्रुपचे कर्मचारी स्वच्छता दूत म्हणून पुढे आले असून डीएम ग्रुपचे 260 कर्मचारी शहरातील विविध भागात स्वच्छता करत आहेत. सोमवार पासून सलग चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात साचलेला गाळ काढून या कार्यालयात डीप क्लीन करून कार्यालयासह परिसर स्वच्छ केला आहे.
मुंबई, पुणे आणि कोल्हापूर सह संपूर्ण राज्यात स्वच्छता सेवेची कामे करणाऱ्या डीएम एंटरप्राइजेस या ग्रुपच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम, औषध फवारणी सुरू आहे. शहरातील लक्ष्मीपुरी, भगवा चौक ते रमणमळा व चिखली या ठिकाणी महानगरपालिका आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम व त्यानंतर जंतुनाशक औषध फवारणीचे काम सुरू आहे. डीएम ग्रुपचे कोल्हापुरातील आणि मुंबई-पुण्यासह सातारा जिल्ह्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता सेवेचे काम सुरू आहे.
पंचगंगेला आलेल्या महापुराचा शहरातील इतर नागरी वस्तीबरोबरच जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातही महापुराचे पाणी अनेक दिवस साचून राहिल्याने त्याठिकाणी गाळाचे साम्राज्य निर्माण झाले होते. कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आवाहन केल्यानंतर डीएम ग्रुप च्या कर्मचाऱ्यांनी सलग चार दिवस काम करून जेट मशिनसह इतर आधुनिक साहित्याचा, केमीकलचा वापर करत जिल्हाधिकारी कार्यालय स्वच्छ केले. याठिकाणी डीएम ग्रुप चे 40 हून अधिक कर्मचारी सलग चार दिवस स्वच्छता दूत म्हणून काम करत होते. महापूरानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेले विद्रुपरूप दूर झाले असुन आज कार्यालय दैनंदीन कामकाजासाठी सज्ज झाले आहे . डीएम ग्रुप कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय स्वच्छ केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी डीएम ग्रुपला धन्यवाद दिले आहेत.
कोल्हापूर शहरात स्वच्छतेचे काम करत असताना चिखली गावातील ज्या शाळेने महापुरात अडकलेल्या लोकांना आसरा दिला होता, त्या शाळेत जाऊन डीएम ग्रुप च्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम केले. शहरातील स्वच्छतेची ही मोहीम अशीच यापुढील काळातही सुरू राहणार असल्याची माहिती ग्रुपचे डायरेक्टर धनंजय पाटील आणि सुखदेव गिरी यांनी दिली. या स्वच्छता मोहिमेमध्ये विभागीय व्यवस्थापक किरण गायकवाड, ऑपरेशन मॅनेजर बाबा पाटील यांच्यासह सुपरवायझर, राऊंडर आणि कर्मचारी सहभागी होते.
000000
Leave a Reply