देशातले पहिले’लीड बॉटॅनिकल गार्डन विद्यापीठात

 

20151117_205227-BlendCollageकोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात साकारलेल्या देशातल्या पहिल्या ‘लीड बॉटॅनिकल गार्डन’चे तसेच नीलांबरी सभागृहाचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी  १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे सहकार मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि कोलकता येथील भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. परमजित सिंग प्रमुख उपस्थित असतील, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाकडून सन २००७मध्ये पश्चिम भारतामधील पहिली लीड बॉटॅनिकल गार्डन म्हणून विद्यापीठातल्या वनस्पतीशास्त्र विभागातील उद्यानास मान्यता मिळाली. त्यानंतरच्या कालावधीत केंद्रीय मंत्रालयासह विविध वित्तीय सहाय्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून या गार्डनच्या विकासासाठी भरीव मदत मिळाली. त्या मदतीमुळे वनस्पतीशास्त्र अधिविभागातील डॉ. एस.आर. यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधकीय प्रयत्नांना एक निश्चित दिशा लाभली. त्यातून आज एक अतिशय उत्तम अशी लीड बॉटॅनिकल गार्डन विद्यापीठात सहा एकरांच्या परिसरात साकारली आहे. देशविदेशातील अनेक दुर्मिळ प्रजातींचे जतन, संगोपन आणि संवर्धन करण्यात या ठिकाणी यश प्राप्त झाले आहे. विभागासह देशातील वनस्पतीशास्त्राच्या संदर्भातील संशोधनाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही वनस्पतींबद्दल जाणीवजागृती करणे, त्यांच्या संवर्धनाविषयी जनमत संघटित करणे आणि त्या कामी सर्वांना मार्गदर्शन करण्याचे कार्य या गार्डनने करणे अभिप्रेत आहे. त्याचबरोबर वनस्पतीशास्त्र अधिविभाग परिसरातील नीलांबरी सभागृहाचे उद्घाटनही जावडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सभागृहाच्या रुपाने विद्यापीठाच्या आवारात आणखी एक देखणी इमारत व आधुनिक सभागृह उपलब्ध झाले आहे. सुमारे १५० आसन क्षमतेचे हे सभागृह आधुनिक मल्टिमीडिया तंत्रज्ञानाने सुसज्ज असून तेथे बॉटॅनिकल गार्डनविषयीची माहिती दर्शकांना दृकश्राव्य माध्यमातून घेता येणे शक्य आहे. त्याचबरोबर कार्यशाळा, परिसंवाद, परिषदा यांसाठीही हे सभागृह उपयुक्त ठरेल.

या वेळी प्रा.डॉ. एस.आर. यादव यांनीही लीड बॉटॅनिकल गार्डनविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम घाटात स्थानिक वनस्पतींच्या सुमारे दोन हजार प्रदेशनिष्ठ प्रजाती आहेत. त्यांमधील दुर्मिळ व लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या संवर्धनाचे काम येथे केले जात आहे. गेल्या दहा वर्षांत पाम (ताड, माड इत्यादी)च्या देशभरातील सुमारे शंभरहून अधिक प्रजातींच्या बिया आणून त्यांची येथे लागवड करण्याचा उपक्रम राबविला. त्यातील ७० प्रजाती आज या ठिकाणी पाहावयास मिळतात. गवत प्रकाराखालोखाल महत्त्वाच्या असणाऱ्या पामच्या इतक्या प्रजाती एका ठिकाणी असणाऱ्या देशातल्या प्रमुख चार बॉटॅनिकल गार्डनपैकी शिवाजी विद्यापीठाची गार्डन आहे. त्सुनामीनंतर अंदमान, निकोबार परिसरातील वनस्पतींच्या दुर्मिळ प्रजाती आणून त्यांचे संवर्धन करण्यातही यश मिळाले आहे. आजघडीला या गार्डनमध्ये अँजिओस्पर्म १०४८, जिम्नोस्पर्म २२ आणि टेरिडोफायटा ६३ अशा एकूण ११३३ प्रजातींच्या वनस्पती पाहावयास मिळतात. दहा वर्षांत इतके वनस्पतीवैभव विद्यापीठाच्या परिसरात उभे करण्यात यश आले आहे. त्याचे लोकार्पण करताना निश्चितपणे आनंद होतो आहे.

या पत्रकार परिषदेस प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह वनस्पतीशास्त्र अधिविभागातील शिक्षक व अधिकारी उपस्थित होते.

One response to “देशातले पहिले’लीड बॉटॅनिकल गार्डन विद्यापीठात”

  1. try out awdio. comits a global dj website.. a little diff than the radios upon below but still awesome Attempt filtermusic. world wide web from the assortment of a great deal of web stereo.

Leave a Reply to Cheap Gucci Outlet Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!