
कोल्हापूर: प्राणी शास्त्राच्या तरुण संशोधकांनी जैवविविधतेसंदर्भात संशोधन करीत असतानाच मानवामध्ये केवळ त्याच्या विचारप्रक्रियेमुळे असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वैविधतेबाबतही मूलगामी संशोधन करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.
विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे ‘जैवविविधता व जैवस्रोतांचे व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या खादी व ग्रामोद्योग आयोगाचे संचालक एम.टी. वाकोडे प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, पर्यावरणातील जैवविविधता आणि तिचे संवर्धन, जतन याबाबतीत संशोधन जितके महत्त्वाचे आहे तितकेच मानवी वैविध्यतेबाबतही आवश्यक आहे. मानवांमध्ये त्यांचा मेंदू हा एक अत्युच्च दर्जाचा जैवस्रोत गॅजेट आहे. त्याद्वारे चालना मिळणाऱ्या विचार प्रक्रियेतील विविधतेमुळे खरे तर या प्रजातीमध्ये विविधता निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात संशोधन आवश्यक आहे. ‘नासा’ या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेला ज्या बहुमोल वैज्ञानिक सूचना येत असतात, त्यातील ८० टक्के या अवैज्ञानिक व्यक्तींकडून येत असतात, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. त्यामुळे संशोधकांनी चाकोरीबाहेर जाऊन प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
वाकोडे यांनी यावेळी सातत्यपूर्ण संशोधनाची गरज अधोरेखित केली. एकदा झालेल्या संशोधनाबाबतही पुनर्संशोधन केले जाऊ शकते. तत्या पुनर्संशोधनाच्या संधी तरुणांनी शोधल्या पाहिजेत. प्रामाणिक व मनापासून केलेल्या संशोधनात चमत्कार घडविण्याची ताकद असते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी परिषदेत झालेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये अनुक्रमे डॉ. सुवर्णा मोरे, नितीन बोलबत्तीन व स्नेहा मोरे विजेते ठरले. तसेच, यावेळी मार्जिना शेख, प्रदीप चौगुले व अफसा मकबूल या सहभागी संशोधक विद्यार्थ्यांनी परिषदेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. परिषदेचे संयोजक सचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी स्वागत केले व अहवाल सादर केला. डॉ. श्रीमती एम.व्ही. वाळवेकर यांनी आभार मानले. डॉ. माधव भिलावे व जयश्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन सहसचिव डॉ. जी.व्ही. झोडापे यांच्यासह शिक्षक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply