
कोल्हापूर: दोन लाख रुपयांच्या सोने-चांदी खरेदीसाठी केंद्र सरकारने पॅन कार्डची सक्ती केली आहे. या आणि इतर जाचक नियमांना विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सराफ संघटनेतर्फे आज शहरात कँडल मार्चचे आयोजन केले आहे.
यासंबंधी अधिक माहिती देताना कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सांगितले की, ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनची मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये ठराव करण्यात आला की, केंद्र शासनाने दोन लाखांच्या खरेदीवरील पॅन कार्ड सक्ती, फॉर्म नंबर 60 व 61 भरून घेणे व सहा वर्षे असे रेकॉर्ड सांभाळावे, अशा जाचक निर्णयाच्या विरोधात सराफ सुवर्णकार संघटनेचा शांततेच्या मार्गाने विरोध दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभर सोमवारी कँडल मार्च काढण्यात येणार आहे.
ते म्हणाले की, त्या अनुषंगाने शहरात सराफ संघाच्या कार्यालयापासून कँडल मार्च काढण्यात येणार आहे. तो महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाईन, माळकर तिकटी शिवाजी चौक ते परत कार्यालय असा कँडल मार्चचा मार्ग असेल. दरम्यान, खासदार व आमदारांना यासंबंधी निवेदन देऊन याची माहिती दिली जाईल. जिल्ह्यातील सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर शहर व्यापारी संघाच्या कार्यालयाजवळ उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Leave a Reply