
कोल्हापूर : पश्च्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ताब्यात आज हजारो एकर जमिनी आहेत. या जमिनी लिलाव पद्धतीने किंवा काहींना भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. परंतु जे कोणी या जमिनींचा गैरवापर करत असतील आणि खंड भरत नसतील त्यांना गैरवापर करू दिला जाणार नाही. तसेच त्यांच्याकडून खंड वसूल केला जाईल,जे देणार नाहीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे नूतन सदस्य एन. डी.उर्फ राजू जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापुराच्या काळात खंड माफ केला गेला होता. परंतु ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्यांनी त्या व्यवस्थित वापराव्यात अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असे सांगितले.
अध्यक्ष महेश जाधव, खजनिस सौ.वैशाली क्षीरसागर,सचिव विजय पोवार, सहाय्यक सचिव शिवाजीराव साळवी, व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे काम आज चांगल्याप्रकारे सुरु आहे. नजीकच्या काळात देवस्थान समितीमार्फत देवल क्लब येथे चार हजार स्क्वेअर फूट जागेत अत्यंत अल्पदरात विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तपासणी लॅब लवकरच सुरू होणार आहे. तसे भाविकांसाठी यात्री निवास, देवस्थान समितीचे स्वतःचे मोफत अन्नछत्र सुरू करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.मंदिराचा परिसर कायमपणे अतिक्रमण मुक्त करण्यात येईल.मंदिर परिसर प्लास्टिक मुक्त तसेच भाविकांना व्यवस्थित प्रसाद मिळण्याची सोय करण्यात येणार आहे. टेंबलाई मंदिर येथील देवस्थान समितीच्या जागेत व्यसनमुक्ती केंद्र व निसर्गोपचार केंद्र करण्यासाठी सूचना मांडणार आहे. समितीचे हे कामकाज आणि वाटचाल अधिक चांगली होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असेही एन.डी ऊर्फ राजू जाधव यांनी सांगितले.
Leave a Reply