
कोल्हापूर: खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार घेणे परवडत नसल्याने रुग्ण हक्क परिषद गोर-गरीब रूग्णासाठी मोफत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी करणार आहे. अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेच्या संस्थापक ऍड.वैशाली चांदणे आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.हे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ३५० बेडचे असून, पुणे येथे हे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. रुग्ण हक्क परिषद ही एक आयएसओ नामांकन संस्था असून संस्थेचे महाराष्ट्रभर जिल्हा व तालुकानिहाय शाखेद्वारे लाखो सभासद कार्यरत आहेत.हॉस्पिटल उभारणीसाठी आवश्यक त्या परवानग्या मिळविण्यात येत आहेत. शासनाच्या काही कागदोपत्री परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित परवानगी मिळाल्यानंतर मार्चमध्ये प्रत्यक्ष कामास सुरवात होईल.
रस्त्यावरील भिकारी,झोपडपट्टीतील गरीब रुग्णांना बड्या खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळत नाही. सध्या महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून रुग्णाला दोन लाखापर्यंत मोफत उपचार मिळतात.मात्र दोन लाखांच्या पुढील रक्कम त्या रुग्णाला द्यावी लागते. मात्र या हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाला पूर्णपणे मोफत उपचार शिवाय सर्व तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. त्यासाठी रुग्ण हक्क परिषद त्याचबरोबर लोकसहभागातून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.दरम्यान रुग्ण हक्क परिषद या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली.पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी डॉ.सलीम आळतेकर तर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी डी.डी.पाटील यांची निवड करण्यात आली आहे.महिला जिल्हा अध्यक्षपदी लतिका शहा, महिला उपाध्यक्ष रंजना पवार व शुभांगी साखरे, कार्याध्यक्षपदी मंगल खुडे आणि सहकार्याध्यक्ष पदी राधिका खडके यांची निवड करण्यात आली.
Leave a Reply