
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागात येत्या २० जानेवारीपासून दोन दिवसीय संगीत व नाटक महोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ संगीतज्ज्ञ पं. नाथराव नेरळकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. एन.व्ही. चिटणीस यांनी दिली आहे.
डॉ. चिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्घाटनानंतर पं.नाथराव नेरळकर आणि डॉ. अंजली मालकर यांचे ‘भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत’ या विषयावर सहप्रयोग व्याख्यान होणार आहे. सायंकाळच्या सत्रात डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. आनंद धर्माधिकारी आणि डॉ. अंजली मालकर यांचे गायन होणार आहे. याच दिवशी सकाळी सुप्रसिद्ध चित्रकार बबन माने यांच्या निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. गुरूवारी (दि. २१) डॉ. पराग घोंगे आणि ज्येष्ठ नाटककार अजित दळवी यांची अनुक्रमे ‘अभिनय’ आणि ‘मी व माझ्या नाट्यसंहिता’ या विषयांवर व्याख्याने होणार आहेत. अभिनय, संहिता आणि इतर विषयांवर ते उपस्थितांशी मुक्तसंवाद साधतील. सायंकाळी संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या नाट्याविष्काराचे सादरीकरण होईल.
या दोन दिवसीय महोत्सवात संगीत आणि नाट्यविषयक विविध पैलूंबाबत विस्तृत विवेचन होणार आहे. कोल्हापुरातील संगीतप्रेमी, हौशी नाट्यकलावंत आणि विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव पर्वणीच ठरणार आहे. महोत्सवाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. चिटणीस यांनी केले आहे.
Leave a Reply