
कोल्हापूर :दोन लाख रुपयांवरील सोने खरेदीसाठी सक्ती केलेल्या पॅनकार्ड विरोधात लोकसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी शिष्टमंडळाला दिले.महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार महामंडळाचे विभागीय अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाडिक यांची भेट घेतली. यावेळी श्री. ओसवाल यांनी सांगितले की, केंद्र सरकारने प्रथम 50 हजार, 1 लाख आणि आता दोन लाख रुपयांच्या वरील खरेदीसाठी पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. शिवाय 60 व 61 नंबरचे फॉर्म भरून घेणे सक्तीचे केले आहे. याचबरोबर सहा वर्षे अशी कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागणार आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी हे पाऊल उचलले असले तरी या निर्णयाचे तोटे अधिक आहेत. देशभरात जवळपास 80 टक्के लोकांकडे पॅनकार्ड नाहीत. त्यामुळे दोन लाखांवरील सोने खरेदी करणे ग्राहकांना शक्य होणार नाही. याशिवाय ग्राहकांकडून फॉर्म भरून घेणे किचकट होईल. कित्येक व्यावसायिक अगदी छोट्याशा जागेत आपला व्यवसाय करतात. तेथे सहा वर्षे कागपत्रांचे जतन करणे कसे शक्य होईल. दुसऱ्या बाजूला सरकारच्या या निर्णयाने सराफ व्यवसाय कोलमडून पडण्याची शक्यता आहे. पॅनकार्ड नसल्यामुळे रोख स्वरूपातील खरेदीला चालना मिळणार नाही. रोख रकमेचा वापर वाढू लागला, तर व्हॅट आणि आयकरामध्येही तूट येऊ शकते. अडचणीच्या काळात आधारासाठी सर्वसामान्य माणून बचत करून सोने खरेदी करतो. पॅनकार्ड सक्तीमुळे त्यावरही मर्यादा येईल. तसेच सराफ व्यवसायातील कारागीर, कामगार यांच्या उपजीविकेवर परिणाम होईल. याला विरोध म्हणून देशभर गेल्या सोमवारी (ता. 18) कँडल मार्चचे आयोजन करून पॅनकार्डची मर्यादा हटविण्याची मागणी करण्यात आली. यासाठी आपल्या इतर सदस्यांच्या मदतीने सभागृहात आवाज उठवावा ही विनंती केली.
यावर महाडिक यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, ज्यावेळी 1 लाख रुपयांवरील खरेदीसाठी पॅनकार्ड सक्ती केली होती त्यावेळीही हा मुद्दा मी सभागृहात मांडला होता. त्यामुळेच येत्या हिवाळी अधिवेशनात पॅनकार्डबरोबरच इतर दोन मुद्देही सभागृहासमोर सविस्तर मांडून त्यावर निश्चितच सकारात्मक निर्णय घेण्यास सरकार भाग पाडेन.भारत ओसवाल यांच्यासोबत खजानिस जितेंद्रकुमार राठोड,सचिव माणिक जैन,संचालक राजेश राठोड,सुनील मंत्री आदी उपस्थित होते.
Leave a Reply