
कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रख्यात बालरोग आणि नवजात अर्भक रोग तज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांना देशपातळीवरील राष्ट्रीय नवजात अर्भक परिषदेने अतिशय प्रतिष्ठेचा अश्या फेलोशिप पुरस्काराने सन्मानित केले. एखाद्या विद्यापीठाच्या डि.लीट पदवीच्या धरतीवरचा हा पुरस्कार आहे. हैदराबादमध्ये नुकताच हा पुरस्कार केंद्रीय निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल यांच्या हस्ते डॉ. संघवी यांना प्रदान करण्यात आला. डॉ. संघवी यांच्या राष्ट्रीय पातळीवरील सन्मानाने कोल्हापूरचे नाव जागतिक वैद्यकीय नकाशावर कोरले गेले. शून्यातून विश्वाकडे अशी प्रगती प्रख्यात बालरोग तज्ञ आणि नवजात अर्भक रोग तज्ञ डॉक्टर प्रकाश संघवी यांनी केली आहे.नवजात अर्भक आणि प्री मॅच्युअर वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी वाहून घेतले. देशांमध्ये प्री मॅच्युअर बेबी जन्माचे प्रमाण ४० टक्के आणि मृत्यू प्रमाण ५० टक्के इतके आहे. प्रगत औषधोपचार पद्धती आणि अन्य वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव असल्यानेच हे सर्व घडत असल्याचे निरीक्षण डॉ. प्रकाश संघवी यांनी नोंदवले. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी डॉ. प्रकाश संघवी यांनी देशपातळीवरील प्रख्यात एम्स हॉस्पिटलसह विविध प्रगत रूग्णालयात जाऊन माहिती घेतली. या रुग्णालयातील विविध विदेशी उपकरणे आपल्या देशात बनवण्यासाठी संशोधन युवकांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या या प्रयत्नातून १९९० साली लहान बाळांसाठी अत्याधुनिक औषध उपचार पद्धतीला चालना मिळाली. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रीय नवजात अर्भक परिषदेने त्यांना दोन वेळा स्पेशल इनोवेशन अवॉर्डने सन्मानित केले आहे.
Leave a Reply