
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने शहर स्वच्छतेप्रती आपली बांधिलकी जोपासताना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी शहरातील २० पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता केली. विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस.) माध्यमातून सकाळी ८ ते ११ या कालावधीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये सुमारे एक हजार एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
सकाळी ८ वाजता बिंदू चौकापासून या स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली. या ठिकाणी जमलेल्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी संबोधित करून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी या मोहिमेस प्रारंभ केला. ‘सदोदित चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत राहावी, यासाठी राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमा उभारल्या जातात. त्यांची स्वच्छता करण्याबरोबरच मनाच्या स्वच्छतेचाही संस्कार या मोहिमेच्या माध्यमातून आपण सर्वांनी मनी रुजवावा,’ असे आवाहन डॉ. शिंदे यांनी यावेळी केले.
बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांसह स्मृतिस्तंभ परिसराची कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, एनएसएस समन्वयक डॉ. सुरेश शिखरे यांनी हाती झाडू घेऊन स्वच्छता केली. महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक टी.डी. पाडळकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मोहिमेत सहभाग घेतला. पुतळा स्वच्छतेसाठी दोन टँकरद्वारे त्यांनी पाणीपुरवठा केला. पुतळे स्वच्छतेनंतर कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्वच्छता करण्यात आलेले पुतळे आणि त्यांची स्वच्छता करणाऱ्या महाविद्यालयांची नावे अशी: बिंदू चौक- देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, पै. खाशाबा जाधव (भवानी मंडप) व संत गाडगेबाबा (ज्योतिबा रोड)- डॉ.डी. शिंदे सरकार महाविद्यालय, राजमाता जिजाऊ (गंगावेस) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कोल्हापूर महानगरपालिका)- यशवंतराव चव्हाण के.एम.सी. महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार (राजारामपुरी)- कमला महाविद्यालय, छत्रपती शाहू महाराज (दसरा चौक) व छत्रपती राजाराम महाराज (व्हीनस कॉर्नर), आईसाहेबांचा पुतळा (अयोध्या टॉकीजजवळ) – श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, ताराराणी पुतळा (कावळा नाका), राजीव गांधी (वटेश्वर मंदिराजवळ)- राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, आईचा पुतळा (माऊली चौक)- राजाराम महाविद्यालय, महात्मा गांधी (गांधी मैदान), जी.कांबळे (खासबाग मैदान) – न्यू कॉलेज, श्रीपतराव बोंद्रे (गोकुळ हॉटेल) – महावीर महाविद्यालय. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, डॉ.आप्पासाहेब पवार, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयाची स्वच्छता करण्यात आली.
Leave a Reply