
कोल्हापूर: ‘मेक इन इंडिया’ ही भारताच्या विकासासंदर्भातील आजपर्यंतची सर्वाधिक सर्वसमावेशक संकल्पना आहे, असे प्रतिपादन या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर वुई केअर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेक इन इंडिया’ या आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. स्वामी म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात भारतात विकासाच्या तीन प्रमुख संकल्पना अस्तित्वात आल्या. त्यामध्ये पहिली आणि महात्मा गांधी यांच्या प्रभावामुळे तातडीने अस्तित्वात आलेली म्हणजे स्वदेशी. स्वयंपूर्ण ग्रामविकासाच्या संकल्पनेतून राष्ट्रविकास साधण्याचा हा प्रयत्न होता. त्यानंतर नियोजन आयोगाच्या स्थापनेनंतर अस्तित्वात आलेली दुसरी संकल्पना होती आत्मनिर्भरता. जे नाही- ते आयात करा आणि आहे ते- निर्यात करा, अशी सर्वसाधारण त्याची रचना होती. आणि तिसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘मेक इन इंडिया’ होय. भारताला बाजारपेठ समजून केवळ येथे येऊन आपला माल विकू नका, तर त्याची निर्मितीही येथेच करा. त्याचबरोबर ही निर्मिती केवळ भारतीय ग्राहक डोळ्यांसमोर ठेवून करू नका, तर त्या उत्पादनांच्या निर्मितीबरोबर निर्यातही करा, असे आवाहन करणारी ही अत्यंत प्रभावी अशी योजना आहे.
‘मेक इन इंडिया’ योजनेच्या अनुषंगाने परकीय कंपन्यांना येथे उत्पादनास परवानगी देत असतानाच देशी उद्योग आणि परकीय उद्योग यांचा समतोलही साधला जाणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून डॉ. स्वामी म्हणाले, वॉलमार्टसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना अमेरिकन बँका दोन टक्के दराने वित्तपुरवठा करतात. अशा कंपन्या भारतात येऊन इथले मनुष्यबळ, पायाभूत सुविधा स्वस्तात वापरून आणखी गब्बर होतील. त्याचवेळी येथील स्थानिक उद्योगांचे कंबरडेही मोडतील. त्यामुळे स्थानिक उद्योगांना कोणतीही हानी पोहोचू न देता परकीय उद्योगांना परवानगी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे.
सरासरी २६ वर्षे वयोगटातील जगातील सर्वाधिक तरुण आज भारतात आहेत, ही आपली क्षमता असल्याचे सांगून डॉ. स्वामी म्हणाले, आज भारताकडे जगातील सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान आहे, जगातील बुद्धीमान तरुणांची संख्याही येथे मोठी आहे. तथापि, आयुष्यामध्ये काही साध्य करण्यासाठी धोका पत्करण्याच्या, नवीन काहीतरी शोधण्याच्या प्रवृत्तीचा मात्र भारतीय युवकांत मोठा अभाव आहे. केवळ मोठे भांडवल, प्रचंड मनुष्यबळ यांच्या बळावर कोणताही देश मोठी आर्थिक प्रगती साधू शकत नाही, तर ती प्रगती केवळ नवसंशोधनाच्या बळावरच साधता येऊ शकते. अशा नवसंशोधनासाठी सज्ज असणाऱ्या मनुष्यबळाची फौज उभी राहिली, तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो. तसे झाल्यास येत्या दहा वर्षांत आपण चीनलाही मागे टाकू शकतो. पुढील सलग दहा वर्षे दहा टक्के वृद्धीदर आपण नोंदविला तर देशातून गरीबीचे समूळ उच्चाटन शक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा विकास, कायद्यांमध्ये सुधारणा आणि भ्रष्टाचाराचे निर्मूलन या बाबतीतही आपल्याला अद्याप मोठे काम करायचे असल्याचेही त्यांनी सांगितले
Leave a Reply