शिवाजी विद्यापीठात २८पासून पदार्थविज्ञान आंतरराष्ट्रीय परिषद

 

20151117_205227-BlendCollageकोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागातर्फे येत्या २८ ते ३० जानेवारी २०१६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘मटेरिअल सायन्स ॲन्ड आयोनायझिंग रेडिएशन सेफ्टी ॲन्ड अवेअरनेस’ असा परिषदेचा विषय आहे. २८ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता ऋषीकेश येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) संचालक प्रा.डॉ. राज कुमार यांच्या हस्ते वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात उद्घाटन करण्यात येणार आहे. ही माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

देशविदेशांतील सुमारे ३५०हून अधिक संशोधक, प्राध्यापक सहभागी होत असलेल्या या परिषदेत एकूण १० सत्रांमधून १८ निमंत्रितांची व्याख्याने, १९ मौखिक सादरीकरणे तसेच पोस्टर प्रेझेंटेशन होणार आहेत. भाभा अणु संशोधन केंद्राचे (बीएआरसी)चे आरोग्य व सुरक्षाविषयक संचालक डॉ. प्रदीप कुमार यांचे प्रथम सत्र होईल. ‘किरणोत्सर्गीय सुरक्षा, अणुऊर्जाविषयक आणीबाणी व त्यावरील उपाययोजना’ या विषयावर त्यांचे मार्गदर्शन होईल. याखेरीज, सोल (कोरिया) येथील हॅनयांग विद्यापीठाचे डॉ. वाय.पी. ली यांचे ‘परफेक्टली ॲबसॉर्बिंग प्रॉपर्टीज ऑफ मेटा-स्ट्रक्चर्स/ मटेरिअल्स’ या विषयावर, बोस्टन (अमेरिका) येथील वुमेन्स कॅन्सर सेंटर, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉ. मंदार भागवत यांचे ‘द माँटे कार्लो सिम्युलेशन ऑफ रेडिएशन ट्रान्स्पोर्ट फॉर रेडिएशन थेरपी’ या विषयावर तसेच ग्रीन्सबोरो (अमेरिका) येथील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील डॉ. श्याम अरवमुधन् यांचे ‘इंजिनिअर्ड नॅनो-मटेरिअल्स हेल्थ इंम्प्लिकेशन्स रिसर्च ॲट द जॉइंट स्कूल ऑफ नॅनोसायन्स ॲन्ड नॅनो-इंजिनिअरिंग’ या विषयावर मार्गदर्शन होईल. याबरोबरच आयआयटी- मुंबई, एनआयटी-जालंधर, साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स, कोलकता, भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई, भारतीय अणुऊर्जा विभाग आदी ठिकाणी कार्यरत तज्ज्ञही परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!