
कोल्हापूर / प्रतिनिधी : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत ही वेदकाळापासून चालत आलेली कला आहे. हा आपला ठेवा आहे. तो आपण जतन केला पाहिजे. तसेच त्याचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. आणि आत्ताची पिढी या अभिजात शास्त्रीय संगीताकडे वळावी यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो, असे प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी सांगितले. ‘मी वसंतराव’ हा शास्त्रीय संगीताचे उपासक व गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट येत्या १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने राहुल देशपांडे यांनी कोल्हापूरमध्ये या चित्रपटाबद्दल काही अनुभव विषद केले. यंदाचे वर्ष हे वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त त्यांनी शास्त्रीय संगीताची जी सेवा केली ती चित्रपट रूपाने लोकांपर्यंत पोहोचवता येईल. त्यांनी फक्त शास्त्रीयच नाही तर लावणी, गझल, लोकगीते ही गायली आहेत. यासाठीच ‘वसंतोत्सव’ ही संकल्पना राबवत आहे.
मी साडेतीन वर्षाचा असताना माझे आजोबा वसंतराव देशपांडे गेले. मला त्यांचा फार सहवास लाभला नाही. पण त्यांचा हा संगीताचा वारसा मी पुढे नेत आहे. माझ्या आजोबांवर चित्रपट काढण्याचे माझे स्वप्न होते. गेली सात वर्षे मी यावर मेहनत घेत आहे. अनेक अडथळे आले तरी यावर मात करून अखेर हा चित्रपट माझ्याकडून घडला असेही राहुल देशपांडे यांनी स्पीड न्यूजशी बोलताना सांगितले.
रियालिटी शोमधून जी पिढी आता या सांगीतिक क्षेत्राकडे वळत आहे, त्यांनी यात सातत्य ठेवलं, कष्ट घेतले तरच अशा व्यासपीठाचा फायदा त्यांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी होऊ शकतो. पाश्चिमात्य संगीतापेक्षा भारतीय संगीताकडे तरुणांचा ओढा वाढला आहे हे दिसत आहे. आणि याचा या पिढीला नक्कीच अभिमान वाटेल अशी अपेक्षा राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली.
Leave a Reply