
कागल : कागल शहरांमध्ये ज्यांचे रेशनकार्डचं नाही, त्यांनाही मोफत तांदूळ व गहू वाटपाचा शुभारंभ झाला. येथील श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात गणेश सोनवणे यांच्या रास्त धान्य दुकानात मातंग वसाहतीच्या ग्रामस्थांना धान्य वाटून हा प्रारंभ झाला . यावेळी शासनाच्या प्रतिमाणसी मोफत पाच किलो तांदूळ या योजनेचाही प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला . यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, विवेक लोटे, सौरभ पाटील, संजय चितारी, बाबासाहेब नाईक,गणेश सोनुले,संग्राम गुरव आदी प्रमुख उपस्थित होते . कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या सहकार्याने नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन, कागल नगरपालिका व कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने हा उपक्रम राबविला आहे. रेशनकार्ड नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला मोफत पाच किलो तांदूळ व पाच किलो गहू याप्रमाणे धान्य दिले जाणार आहे. यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, हा उपक्रम कागल, गडहिंग्लज व उत्तूर या विधानसभा मतदारसंघांमध्ये राबवण्याचा मानस ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा आहे. धान्य सर्वांनाच मिळावे, कुणीही त्यापासून वंचित राहू नये या भूमिकेतून किती कुटुंबाचे रेशनकार्डच नाही, याची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच, तात्काळ मोफत रेशन देण्याची तारीख जाहीर करू.
नविद मुश्रीफ म्हणाले, रेशन कार्डच नाहीत असे असंख्य लोक आहेत. त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला असून ते अत्यंत गरीब व अतिगरीबही आहेत. तशातच कोरुना या जागतिक महामारीमुळे लॉकडाऊन आहे त्यामुळे कामेही ठप्प आहेत. उत्पन्नाचे सारे मार्गच बंद झाले आहेत. त्यामुळे उपासमार होत आहे, म्हणून आमदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन, कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कागल नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे.
Leave a Reply