
कोल्हापूर: भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांचा वाढदिवस असतो. यंदा लॉक डाऊन मुळें, महाडिक परिवाराने हा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गेले दीड महिना काम नसल्याने, गोरगरीब नागरिक अडचणीत आले आहेत. विशेषतः घरकाम करणाऱ्या अनेक महिलांना सुद्धा सक्तीची सुट्टी घ्यावी लागली आहे. अरुंधती महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त, अशा 500 घरेलू कामगार महिलांना, शुक्रवारी जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. सदर बाजार परिसरातील एका मैदानावर बोलावून, अत्यंत शिस्तबद्ध रितीने, सोशल डिस्टन्सिंग पाळत, या किटचे वितरण करण्यात आले. दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तूंचा समावेश होता. मैदानावर आखलेल्या चौकोनात, प्रत्येक महिला भगिनींना बसवून, सुरवातीलाच मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हज देण्यात आले. यावेळी बोलताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी, प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. पण लॉक डाऊन संपल्यानंतरही प्रत्येकाने सावधानता बाळगून, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे यासाठी जागरूक असले पाहिजे, असे महाडिक म्हणाले.सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात आपण नेहमीच सोबत आहोत, असेही धनंजय महाडिक यांनी नमूद केले. तर नगरसेविका सौ. स्मिता माने यांनी, अरुंधती महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल, महाडिक परिवाराचे आभार मानले. महापूर- लॉक डाऊन ची परिस्थिती, प्रत्येक अडचणीच्या काळात महाडिक परिवाराने दाखवलेले दातृत्व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातूनच आपले पती मारुती माने यांनीसुद्धा सदर बाजार परिसरातील शेकडो कुटुंबांना ताजा भाजीपाला आणि अन्न धान्य दिल्याचे नमूद केले.यावेळी उपस्थितअनेक घरेलू कामगार महिलांनी, सौ. अरुंधती महाडिक यांना शुभेच्छा दिल्या. शिवाय अत्यंत कठीण काळात आपुलकी आणि आस्था दाखवून मदत केल्याबद्दल, संपूर्ण महाडिक परिवाराला भरभरून आशीर्वाद दिले. हाताला काम नाही, उत्पन्न नाही अशा काळात हतबल आणि निराश झालेल्या अनेक महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना झळकली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती माने, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज आणि कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply