
कोल्हापूर:सर्व सुविधांनी युक्त शहरी जीवन आणि सुविधांपासून वंचित ग्रामीण जीवन यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. परंतु; कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शहरात मिळणाऱ्या सुविधा गावातील शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवून शहर आणि गाव हि दरीच कमी केली आहे, असे गौरवोद्गार नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी काढले.बँकेच्या केडीसीसी मोबाईल बँकिंग आणि अद्ययावत वेबसाइटचे लॉन्चिंग डॉ . थोरात यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते.भाषणात डॉ. यशवंतराव थोरात म्हणाले श्री. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांच्या पाठबळावर बँकेने घेतलेली गरुडभरारी लौकिकास्पद आहे. या बँकेने आर्थिक निकष तर पार केलेले आहेत, यापुढे सामाजिक निकष पूर्ण करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दूरगामी सुधारणा या लोकशाही पद्धतीने केल्या पाहिजेत, यावर माझा विश्वास आहे. माझा हा विश्वास या बँकेने सार्थ करून दाखविला आहे. पाच वर्षांपूर्वी हे संचालक मंडळ सत्तेवर येताना असलेला १३० कोटीचा संचित तोटा भरून काढून आजघडीला बँक १३६ कोटींच्या ढोबळ नफ्यात आणली आहे, हे त्याचेच द्योतक आहे.बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, प्रामुख्याने शेतकरीच ग्राहक असलेल्या या बँकेने तंत्रज्ञानात गरुडभरारी घेतली आहे. आजघडीला अडीच लाखाहून अधिक शेतकरी खातेदार किसान क्रेडिट कार्डचा वापर करीत आहेत. येत्या दोन वर्षात या बँकेला देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुढे आणू, असा विश्वासही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. नोटाबंदीमध्ये रिझर्व बँकेने जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा स्वीकारल्या नाहीत. नोटा बदलून देण्याचा अधिकार सर्व बँकांना दिला, परंतु जिल्हा बँकांना दिला नाही. या अन्यायाचा सगळ्यात मोठा फटका जिल्हा बँकांना पर्यायाने शेतकऱ्यांना बसला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.शेतकरी खातेदार रवी निंबाळकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची जननी असलेल्या या बँकेचे जिल्ह्यातील पिढ्यानपिढ्याशी ऋणानुबंध आहेत.जिल्हा बँकेच्या केंद्र कार्यालयासह सर्वच म्हणजे १९१ शाखांमधून जिल्ह्यातील आठ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना शाखेत न येता डिजिटल व्यवहार करता येणार.खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, खाते उतारा पाहणे, चेकबुक मागणी, मुदतबंद व रिकरिंग ठेव खाते उघडणे, बँकेतर्गत इतर खात्यामध्ये रक्कम वर्ग आदि व्यवहार करता येणार.NEFT व IMPS या सुविधांद्वारे इतर बँकांच्या ग्राहकांच्या खात्यावर सुद्धा रक्कम वर्ग करता येणार आहे.UPI व Bharat Bill Payment System याद्वारे मोबाईल फोन, विज बिल, पाणी बिल, मोबाईल व डिश टिव्ही रिचार्ज रक्कमा अदा करता येणार.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह ग्राहक, नोकरदार व इतर घटकांना या सुविधांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, पी. जी. शिंदे, आर. के.पोवार, अनिल पाटील, विलासराव गाताडे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने , आसिफ फरास यांच्यासह नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक आदी प्रमुख उपस्थित होते.प्रास्ताविकात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी .माने यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी मोबाईल बँकिंग व अद्ययावत वेबसाईटबद्दल सविस्तर माहिती दिली.
Leave a Reply