कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे वेबिनार

 

कोल्हापूर  : वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या व्यवयासात आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देऊन त्याला गतवैभव मिळवून देऊया, असा आश्वासक पाठिंबा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे अध्यक्ष अनिल वाघाडकर यांनी दिला.कोल्हापूर जिल्हा सराफ संघ, सांगली जिल्हा सराफ समिती, सिंधुदुर्ग जिल्हा सराफ संघ आणि ज्वेलर्स साथीच्या सहयोगाने उडान-२०२० या कार्यक्रमांतर्गत झूम अपच्या माध्यमातून सराफ व सुवर्णकारांसाठी वेबिनार चर्चासत्राचे आयोजन केले होते. कोरोना व्हायरसमुळे जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीत होणारे बदल आणि ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये कशी असेल व्यापाराची स्थिती या दोन प्रमुख मुद्द्यांबरोबर उपस्थित होणाऱ्या शंका-कुशंकावर आधारित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सराफ व्यावसायिकांची उपस्थिती होती.

श्री. रांका म्हणाले, प्रत्येक जण चिंतेत आहे. अशावेळी संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवा. आपला व्यवसाय वाढवावयाचा असेल तर ऑनलाईन व्यवसाय करा, आपल्या ग्राहकांशी व्हॉटस अपच्या माध्यमातून संपर्कात राहा. सेवेला महत्त्व द्या. आज जरी व्यवसाय नसला तरी पुढे श्रावण महिना, गणपती, नवरात्री, दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराई येईल.ते म्हणाले, प्रामुख्याने कोल्हापूर शहर दागिन्यांचे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. अशावेळी एमएसएमईसारख्या योजनांच्या माध्यमातून कर्ज घ्या आणि व्यवसाय वाढवा. स्थानिक पातळीवर एकच नियम ठरवा, दर स्थिर ठेवा. वाघाडकर म्हणाले, संघटित होऊन संकटाचा सामना करू या. या निमित्ताने आमची सरकारकडे मागणी आहे ती म्हणजे, आम्हाला अनुदान नको तर इन्कम टॅक्सचा दर कमी करा, जीएसटीचा दर कमी करा आणि व्याज माफ करा. सांगली जिल्हा सराफ समितीचे मार्गदर्शक किशोर पंडित यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी स्थानिक प्रशासनाबरोबर आमदार चंद्रकांत जाधव आणि चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी उद्योग-व्यापार सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सम-विषम तारखेला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली असली तरी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रथम आपले दुकान, कर्मचारी आणि ग्राहकांच्या सुरक्षा याला प्राधान्य द्या. व्यवसायाशी संबंधित कौशल्यकेंद्रित घेऊन स्वतःला समक्ष बनवा, असेही श्री. ओसवाल यांनी सांगितले. शैलेंद्र उपाध्याय यांनी सूत्रसंचालन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!